'...ही काळ्या दगडावरची पांढरी रेघ'; अशोक चव्हाणांना बालेकिल्ल्यातच काँग्रेस आमदाराकडून आव्हान

By ऑनलाइन लोकमत | Published: February 16, 2024 04:25 PM2024-02-16T16:25:32+5:302024-02-16T17:06:36+5:30

आगामी काळात भाजपमध्ये आपलं वजन वाढवण्यासाठी अशोक चव्हाण यांना काँग्रेसमधील नेते आणि पदाधिकाऱ्यांनाही आपल्याकडे खेचावं लागणार आहे.

Congress MLA Mohan Hambarde challenges Ashok Chavan in nanded | '...ही काळ्या दगडावरची पांढरी रेघ'; अशोक चव्हाणांना बालेकिल्ल्यातच काँग्रेस आमदाराकडून आव्हान

'...ही काळ्या दगडावरची पांढरी रेघ'; अशोक चव्हाणांना बालेकिल्ल्यातच काँग्रेस आमदाराकडून आव्हान

Ashok Chavan Vs Nanded Congress ( Marathi News ) : राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अशोक चव्हाण यांनी नुकताच भाजपमध्ये प्रवेश केला. कधीकाळी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्षपद सांभाळलेल्या अशोक चव्हाण यांच्या भाजप प्रवेशानंतर त्यांचा गृहजिल्हा असणाऱ्या नांदेडसह राज्यातील त्यांचे समर्थक आमदार आणि नेतेही भाजपमध्ये प्रवेश करू शकतात, अशी शक्यता वर्तवली जात होती. मात्र भाजप प्रवेशानंतर आता अशोक चव्हाण यांना बालेकिल्ला असणाऱ्या नांदेडमधूनच आव्हान दिलं जात असून नांदेड दक्षिण विधानसभा मतदारसंघातील आमदार मोहन हंबर्डे यांनी यापुढेही नांदेड जिल्हा हा काँग्रेसचाच बालेकिल्ला राहील, असं म्हणत चव्हाण यांना उघड आव्हान दिलं आहे. 

अशोक चव्हाणांच्या भाजप प्रवेशाच्या पार्श्वभूमीवर काल नांदेड जिल्हा काँग्रेस कमिटीची बैठक पार पडली. या बैठकीविषयी माहिती देत आमदार मोहन हंबर्डे यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे. "अशोकराव चव्हाण साहेब भाजपमध्ये गेले. ही बाब विश्वासार्ह नसली तरी हे सत्य आपल्याला स्वीकारावं लागेल. नांदेड जिल्हा काँग्रेसचा बालेकिल्ला, ही ओळख संपूर्ण देशात कालही होती, आजही आहे आणि भविष्यातही राहणार, ही काळ्या दगडावरची पांढरी रेघ आहे," असं आमदार हंबर्डे यांनी म्हटलं आहे.

काँग्रेसच्या बैठकीत कार्यकर्त्यांना बळ देताना मोहन हंबर्डे म्हणाले की, "कै.डॉ.शंकरराव चव्हाण साहेबांचा वैचारिक वारसा चालवण्याची जबाबदारी आता आपल्यावर आहे आणि म्हणून त्याच जिद्दीने, त्याच तयारीने आपण सर्वांनी कामाला लागावं.  लढू, जिंकू आणि संघर्ष करू हे नांदेडकरांच्या रक्तात काँग्रेस आहे. त्यामुळे चिंता करण्याचं काही कारण नाही," अशा शब्दांत आमदार मोहन हंबर्डे यांनी आगामी काळात अशोक चव्हाण यांच्याविरोधात राजकीय संघर्ष करण्याचे संकेत दिले आहेत.

दरम्यान, भाजपमध्ये प्रवेश करताच अशोक चव्हाण यांना राज्यसभेची संधी देण्यात आली आहे. चव्हाण यांनी काल भाजपकडून राज्यसभा निवडणुकीत आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. आगामी काळात भाजपमध्ये आपलं वजन वाढवण्यासाठी अशोक चव्हाण यांना काँग्रेसमधील नेते आणि पदाधिकाऱ्यांनाही आपल्याकडे खेचावं लागणार आहे. त्यामुळे लोकसभा निवडणुकीत नांदेड जिल्ह्यात काय घडामोडी घडतात, हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.

Web Title: Congress MLA Mohan Hambarde challenges Ashok Chavan in nanded

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.