लोहा : लोहा नगर पालिका निवडणुकीसाठी काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची आघाडी झाली असून पाच जागेवर राष्ट्रवादी काँग्रेस व नगराध्यक्षासह बारा जागेवर काँग्रेस पक्ष लढणार आहे, अशी घोषणा माजी पालकमंत्री आ. डी.पी. सावंत यांनी केली.लोहा नगरपालिकेच्या पार्श्वभूमीवर आज उपनगराध्यक्ष संगेवार यांच्या कार्यालयात पत्रकार परिषदेत माजी पालकमंत्री आ. डी.पी. सावंत यांनी काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसच्या आघाडीची घोषणा केली. यावेळी आ. अमरनाथ राजूरकर, माजी आ. शंकरअण्णा धोंडगे, माजी आ. रोहिदास चव्हाण, पक्षाचे जिल्हा प्रवक्ते संतोष पांडागळे, उपमहापौर विनय गिरडे, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष संजय पाटील क-हाळे, काँग्रेसचे शहराध्यक्ष वसंतराव पवार, उपनगराध्यक्ष व्यंकटेश संगेवार यासह प्रमुख उपस्थित होते.लोहा नगरपालिका निवडणुकीसाठी काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यात आघाडी झाली आहे. नगरध्यक्ष व बारा जागेवर काँग्रेस आणि पाच जागेवर राष्ट्रवादी काँग्रेस निवडणूक आपआपल्या पक्षाच्या चिन्हावर लढणार आहेत, अशी घोषणा माजी मंत्री आ. डी.पी. सावंत यांनी केली. नगराध्यक्ष व उमेदवार हे सोमवारी जाहीर करु असे यावेळी स्पष्ट केले. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते माजी आ. शंकरअण्णा धोंडगे यांनी आघाडीच्या घोषणेला संमती दर्शविली व केंद्र व राज्यात सत्ताधारी भाजप पराभूत होणार आहे, असा विश्वास व्यक्त केला. आ. अमरनाथ राजूरकर यांनी काँग्रेस अंतर्गत कोणताही वाद नसल्याचे एका प्रश्नांच्या उत्तरात सांगितले.भाजपाकडून नगराध्यक्ष पदासाठी गजानन सूर्यवंशी
- लोहा नगरपालिकेसाठी येत्या ९ डिसेंबर रोजी नगरपालिकेसाठी मतदान होणार आहे. भाजपाच्या वतीने नगराध्यक्षपदाची उमेदवारी गजानन सुरवंशी यांना दिल्याची घोषणा भाजपाचे जिल्हाध्यक्ष तथा आ. राम पाटील रातोळीकर व आ. प्रतापराव पाटील चिखलीकर यांनी संयुक्तरीत्या पत्रकार परिषदेत केली.
- यावेळी भाजपाचे प्रदेश कार्यकारिणी सदस्य माणिकराव मुकदम, जि. प. सदस्य चंद्र्रसेन पाटील, केरबा बिडवई, सदाशिव अंभोरे, बाजीराव देशपांडे, प्रविण पाटील चिखलीकर यांची उपस्थिती होती. आ़ राम पाटील रातोळीकर म्हणाले की, विकासाच्या मुद्यावर भाजपा निवडणूक लढविणार असून १७ उमेदवार लवकरच जाहीर करण्यात येणार आहेत. कुंडलवाडी आणि सांगलीच्या धरतीवर लोहा नगरपालिका भाजपाच्या ताब्यात येईल, असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला. लोहा शहर मॉडेल शहर म्हणून विकास करू अशी ग्वाही रातोळीकर यांनी दिली.
- आ़ प्रतापराव पाटील चिखलीकर म्हणाले, लिंबोटी धरणातून कायमस्वरूपी लोहा शहरास पाणीपुरवठा करण्यासाठी ३५ कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून शहरवासीयांची पाण्याची समस्या दूर करणार आहे. भाजपासोबत युती करण्यासाठी जो पक्ष तयार आहे, त्यांच्याशी आम्ही युती करण्यास तयार आहोत. यावेळी दत्ता वाले, केशव मुकदम, सुरेश पाटील हिलाल आदी उपस्थित होते़