नांदेड : काँग्रेसचे अनेक गद्दार आज भाजपात दाखल झाले आहेत़ आज ते सत्ताधारी म्हणून मिरवत आहेत़ आज जे काँग्रेसमध्ये आहेत ते मनापासून काँग्रेसचे कार्यकर्ते आहेत़ याच कार्यकर्त्यांच्या बळावर आगामी काळात जिल्हा बळकावणाऱ्यांना आम्ही जागा दाखवू असा विश्वास कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी व्यक्त केला.
शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांवर गुरुवारी जिल्हाभरात धरणे आंदोलन करण्यात आले़ नांदेड जिल्हाधिकारी कार्यालयापुढे झालेल्या धरणे आंदोलनात माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण हेही सहभागी झाले होते़ यावेळी ते म्हणाले, नांदेड जिल्ह्यात प्रशासन आणि पुढाऱ्यांनी एकत्र येत मोठी लुट सुरू केल्याचा गंभीर आरोपही चव्हाण यांनी केला़ प्रत्येक विभागात भ्रष्टाचारांना कुरण उपलब्ध झाले आहे़ कोणतीही ठोस कारवाई अधिकाऱ्यांकडून होत नसल्याने भ्रष्टाचार मोठ्या प्रमाणात बोकाळला आहे़ जिल्ह्यात पाणीटंचाईचे भीषण संकट असताना वाळूचे शेकडो ट्रक परराज्यात जात आहेत़ महसूल अधिकारी मात्र आपला वाटा घेवून मोकळे होत असल्याची टीकाही त्यांनी केली़ यावेळी आ़डी़पी़सावंत यांनीही सरकारच्या शेतकरी विरोधी धोरणावर टीका केली.
आम्ही पदाला चिकटलेली माणस नाहीत राहुल गांधी यांनी लोकसभेतील पराभवाची नैतिक जबाबदारी घेऊन अध्यक्ष पदाचा राजीनामा दिला आहे. कॉंग्रेस पक्ष थांबणारा नाही, सामान्य माणसाच्या प्रश्नाला पक्ष कायम आवाज देत राहील. आम्ही पदाला चिकटून राहणारी माणस नाहीत अशा शब्दात चव्हाण यांनी राहुल गांधी यांच्या राजीनाम्यावर मत व्यक्त केले.