APMC Election Result: हिमायतनगरमध्ये राष्ट्रवादी-ठाकरे गटाचा पराभव करत काँग्रेस विजयी
By श्रीनिवास भोसले | Published: April 29, 2023 01:54 PM2023-04-29T13:54:54+5:302023-04-29T13:55:34+5:30
माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली चारही बाजार समितीमध्ये प्रचार यंत्रणा राबविली गेली.
नांदेड : जिल्ह्यातील चार बाजार समित्यांसाठी शुक्रवारी मतदान झाले. त्यानंतर आज तीन बाजार समितीची मतमोजणी होत आहे. हाती आलेल्या निकालानुसार महाविकास आघाडी आघाडीवर असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.
माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली चारही बाजार समितीमध्ये प्रचार यंत्रणा राबविली गेली. हिमायतनगर बाजार समितीमध्ये काँग्रेसने निर्विवाद यश संपादन केले आहे. या ठिकाणी राष्ट्रवादी आणि शिवसेना ठाकरे गट युतीच्या पॅनलचा काँग्रेसने दारुण पराभव केला तर भोकर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये काँगेस-राष्ट्रवादी आघाडीचा पॅनल आघाडीवर असून आतापर्यंत चार जागांचा निकाल हाती आला आहे. त्या जागेवर महाविकास आघाडीचेच उमेदवार विजयी झाले आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील बाजार समित्यांमध्ये महाविकास आघाडीची विजयाकडे घोडदौड सुरू आहे.
आमदार - माजी आमदारांनी केली होती प्रतिष्ठेची
हिमायतनगर येथील निवडणूक विद्यमान आमदार माधवराव जवळगावकर आणि माजी आमदार नागेश अष्टीकर यांनी प्रतिष्ठित केली होती. परंतु मतदारांनी जळगावकर यांच्या नेतृत्वातील काँग्रेसच्या पॅनलला भरभरून प्रतिसाद देत 18 पैकी 18 उमेदवार विजयी केले आहेत.