इंधन दरवाढीविरोधात कॉंग्रेसचा हल्लाबोल; भरपावसात अशोकराव चव्हाणांच्या नेतृत्वात बैलगाडी मोर्चा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 15, 2021 01:16 PM2021-07-15T13:16:52+5:302021-07-15T13:20:22+5:30
इंधन दरवाढ व महागाई विरोधात जनतेचा आवाज मोदी सरकारच्या कानावर पडावा व केंद्र शासनाने याबाबत सकारात्मक निर्णय घ्यावा यासाठी राज्यभर काँग्रेसच्या वतीने आंदोलन करण्यात येत आहेत.
नांदेड : सातत्याने होणा-या इंधन दरवाढ व महागाईच्या विरोधात गुरूवारी काँग्रेसच्यावतीने बैलगाडी अन सायकल मोर्चा काढण्यात आला. जुना मोंढा येथून निघालेल्या मोर्चाचे नेतृत्व जिल्ह्याचे पालकमंत्री अशोकराव चव्हाण यांनी केले.
इंधन दरवाढ व महागाई विरोधात जनतेचा आवाज मोदी सरकारच्या कानावर पडावा व केंद्र शासनाने याबाबत सकारात्मक निर्णय घ्यावा यासाठी राज्यभर काँग्रेसच्या वतीने आंदोलन करण्यात येत आहेत. गुरुवारी पालकमंत्री अशोकराव चव्हाण यांच्या नेतृत्वात बैलगाडी व सायकल मोर्च्याचे आयोजन करण्यात आले होते. जुना मोंढा येथून मोर्चास सुरुवात झाली, पाऊस सुरू असतानाही कार्यकर्त्यांनी उस्फुर्त सहभाग नोंदवला. बैलगाड्यांची संख्या लक्षणीय होती. मोंढ्यातून निघालेल्या मोर्चात सहभागी कार्यकर्त्यांनी मोदी सरकार विरोधात घोषणाबाजी केली. सदर मोर्चा महावीर चौक मार्गे जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला.
मोर्चाच्या सांगता कार्यक्रमात अशोकराव चव्हाण यांनी आंदोलनकर्त्यांना मार्गदर्शन केले. यावेळी महानगराध्यक्ष आ. अमरनाथ राजूरकर, माजी पालकमंत्री डी.पी.सावंत, आ.मोहनअण्णा हंबर्डे, आ. माधवराव पाटील जवळगावकर, जि.प. अध्यक्षा मंगाराणी अंबुलगेकर, महापौर मोहिनीताई येवनकर, जिल्हा बँकेचे अध्यक्ष वसंतराव चव्हाण, माजी आ.हनमंत पाटील बेटमोगरेकर, जिल्हाध्यक्ष गोविंदराव शिंदे नागेलीकर, युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष पप्पू कोंढेकर, शहर जिल्हाध्यक्ष डाॅ. विठ्ठल पावडे, महिला काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षा कविता कळसकर, शहराध्यक्षा अऩुजा तेहरा, ब्लाॅक काँग्रेसचे अध्यक्ष किशोर स्वामी, विनोद कांचनगिरे, युवक काँग्रेस विधानसभा अध्यक्ष अब्दुल गफार, सत्यजित भोसले आदींची उपस्थिती होती.