मुस्लिमांना एकटे पाडण्याचे षडयंत्र

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 18, 2019 12:41 AM2019-01-18T00:41:26+5:302019-01-18T00:43:08+5:30

भाजपाने देशात मुस्लिमांना वंचित केले आहे तर काँग्रेस ओबीसींना वंचित करु पाहत आहे, अशी टीका भारिप बहुजन महासंघाचे नेते अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांनी केली.

Conspiracy to cast Muslims alone | मुस्लिमांना एकटे पाडण्याचे षडयंत्र

मुस्लिमांना एकटे पाडण्याचे षडयंत्र

Next
ठळक मुद्देसत्ता संपादन मेळावा प्रकाश आंबेडकर यांचा आरोप

नांदेड : भाजपाने देशात मुस्लिमांना वंचित केले आहे तर काँग्रेस ओबीसींना वंचित करु पाहत आहे, अशी टीका भारिप बहुजन महासंघाचे नेते अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांनी केली.
नांदेडमध्ये गुरुवारी वंचित बहुजन आघाडीचा सत्ता संपादन मेळावा शहरातील नवामोंढा मैदानावर घेण्यात आला. यावेळी ‘एमआयएम’चे पक्षप्रमुख असुदोद्दीन ओवेसी यांची प्रमुख उपस्थिती होती.
अ‍ॅड. आंबेडकर म्हणाले, ‘आरएसएस’चा देशात छुपा अजेंडा राबविला जात आहे. सांस्कृतिक राष्टवाद या नावाखाली देशाचे विभाजन केले जात आहे. ‘आरएसएस’चा सांस्कृतिक राष्टवाद नेमका काय आहे, हे आरएसएसचे प्रमुख मोहन भागवत यांनी स्पष्ट करावे. या विषयावर आपण जाहीर चर्चा करायला तयार असल्याचे आंबेडकर यांनी सांगितले. सांस्कृतिक संघटनेविरुद्ध लढा देण्याची वेळ आल्याचे ते म्हणाले. २०२२ मध्ये भाजपा संविधानात बदल करुन भारतीय घटनेने दिलेला मताचा अधिकार काढून जातीच्या नावाने कुबड्या उभे करण्याचे काम करत आहे. त्यामुळे आज संविधान वाचविण्याची गरज असल्याचे अ‍ॅड. आंबेडकर म्हणाले.
देशात आज मुस्लिमांना भाजपाने वंचित केले आहे. तर ओबीसींना काँग्रेस वंचित करत आहे. आघाडीसाठी ‘एमआयएम’चा मुद्दा पुढे आणला जात असला तरी काँग्रेस खऱ्या अर्थाने ओबीसींना सत्तेपासून दूर ठेवू पाहत आहे. वंचित बहुजन आघाडीने ओबीसींना सत्तेत आणण्यासाठी केलेले प्रयत्न काँग्रेसला नको असल्याचेही त्यांनी सांगितले. ‘एमआयएम’चे पक्षप्रमुख खा. ओवेसी यांनी घेतलेल्या भूमिकेचे स्वागत करताना उत्तर प्रदेशात काँग्रेसला सपा-बसपाने आघाडीत घेतले नाही. त्यामुळे काँग्रेसने तेथे ८० जागा लढविण्याची भूमिका घेतली आहे. ‘एमआयएम’ही राज्यात ४८ जागा लढवू शकली असती. मात्र ‘एमआयएम’ने संविधान वाचविण्यासाठी घेतलेली ही भूमिका खूप मोठी असल्याचे ते म्हणाले.
खा. ओवेसी यांनी मुस्लिम समाज काँग्रेसच्या भूलथापांना आणखी किती दिवस बळी पडणार आहे ? असा सवाल केला. भाजपाच्या हिंदू राष्टवादावरही त्यांनी टीका केली. मुस्लिमांना आरक्षण देण्याचा विषय बाजूलाच पडला आहे. पण पुढील काळात ‘वोट हमारा, राज हमारा’ अशी रणनिती राहील, असेही त्यांनी स्पष्ट केले. शिवसेनेवरही ओवेसी यांनी टीका करताना सकाळी भाईभाई, रात्री दुश्मन-दुश्मन तर कधी रात्री भाईभाई, सकाळी दुश्मन-दुश्मन, अशी भूमीका सेनेची असल्याचे सांगितले. लोकसभा निवडणुकीनंतर सेना सत्तेपासून दूर व्हायचे की नाही हे ठरवेल, असेही ते म्हणाले. ओबीसींनीही आता सेना-भाजपा, काँग्रेस-राष्ट्रवादी यांच्यापासून दूर राहण्याची वेळ आली आहे. राज्यात अनेक घोटाळे झाले. पण अटक केवळ छगन भुजबळ यांना झाली. पवारांचा पुतण्या काय ‘धुतल्या तांदळासारखा होता ?’ असा सवालही ओवेसी यांनी केला.
आ. इम्तीयाज जलील यांनी डॉ. बाबासाहेब आंंबेडकरांचे सत्ता संपादनाचे स्वप्न अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर आणि खा. ओवेसी हे पूर्ण करीत असल्याचे सांगितले. अ‍ॅड. आंबेडकर आणि खा. ओवेसी यांच्याबाबत अनेक चर्चा केली जात आहे. मात्र ते आज एका मंचावर आहेत हे सर्वांनी पहावे, असेही ते म्हणाले.
सभेत एमआयएमचे जिल्हाध्यक्ष फेरोज लाला, रामचंद्र भरांडे, प्रा. यशपाल भिंगे, अ‍ॅड. शिवानंद हैबतपुरे, पक्षाचे महासचिव अमित भुईगळ, प्रदेशाध्यक्ष अशोक सोनवणे, माजी आ. हरिभाऊ भदे यांचीही समयोचित भाषणे झाली. प्रास्ताविक भारिपचे जिल्हाध्यक्ष डॉ. संघरत्न कु-हे यांनी केले. सूत्रसंचालन करून आभार प्रा. विकास कदम यांनी मानले. मोठ्या संख्येने यावेळी जनसमुदाय उपस्थित होता.

Web Title: Conspiracy to cast Muslims alone

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.