नांदेड : कोरोना संकटाने जगभर थैमान घातले आहे. राज्यातही अनेक मृत्यू झाले आहेत. प्रत्येकाच्या दारात मृत्यू उभा आहे. अशा या परिस्थितीत सर्वांनी एकत्रित येवून या संकटाचा सामना करणे अपेक्षित असताना भाजपाच्या काही नेत्यांनी सत्तेसाठी राजभवनाचे उंबरठे झिजविले. हे खेदजनक तसेच संतापजनक असल्याची टिका करीत माजी केंद्रीय राज्यमंत्री तथा भाजप प्रदेश कार्यकारिणी सदस्या सूर्यकांता पाटील यांनी राजकीय संन्यासाची घोषणा केली.
नगरसेवक ते केंद्रीय मंत्री अशी पदे भूषविलेल्या सूर्यकांत पाटील यांची राजकीय कारकीर्द काँग्रेस पक्षातून सुरू झाली. राष्टÑवादी काँग्रेसच्या स्थापनेनंतर त्यांनी शरद पवार यांच्यासोबत जाण्याचा निर्णय घेतला. त्या तीन वेळा लोकसभा निवडणूक जिंकल्या आहेत. २०१४ नंतर त्यांनी भाजपात प्रवेश केला.
विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी राजभवनाला खेटे घातले, हे वेदनादायी होते. मुख्यमंत्रीउद्धव ठाकरे हे चांगले काम करीत आहेत, असे त्यांनी ‘लोकमत’ला सांगितले.