आरोग्यसेविका विद्या चंदेल सन्मानित
बहाद्दरपुरा : जागतिक परिचारिका दिनाचे औचित्य साधून बहाद्दरपुरा ग्रामपंचायतीच्या वतीने कार्यरत एएनएम विद्या चंदेल-राजपूत यांचा उपसरपंच कल्पना पेटकर यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. कार्यक्रमाला ग्रामपंचायत सदस्या सुमनबाई खरात, ग्रामसेवक परशुराम वाडीकर, सचिन पेटकर, तानाजी पेटकर, रवींद्र कदम, सुलतानमिया, दीपाली गोरे, शेख सलीमाबी, रेखा झडते, कांचन कुरुडे, रुक्साना, शिवकांता भुसेवाड आदी उपस्थित होते.
वीजबिल न भरण्याचा निर्णय
बहाद्दरपुरा : विजेच्या लपंडावाला वैतागलेल्या बहाद्दरपुरा येथील नागरिकांनी बुधवारपासून वीजबिल भरायचे नाही असा निर्धार केला. वास्तविक हे गाव बिल भरण्यामध्ये सर्वात पुढे आहे. गावची १०० टक्के वसुली असते. किरकोळ दुरुस्ती असली तरीही नागरिक स्वखर्चाने साहित्य आणून देतात. डीपी जळाली तर गावातील युवक खांद्यावर उचलून आणतात. गावातील एकाही घरावर आकडा टाकून अनधिकृतपणे वीज घेतलेली नाही, असे असतानाही वीज वितरण कंपनी मस्तवालपणा करीत असल्याचा आरोप करून नागरिकांनी वरील प्रमाणे निर्णय घेतला.
संभाजीराजे जयंती घरात साजरी करा
नांदेड : छत्रपती शंभूराजे जन्मोत्सव १४ मे रोजी आहे. समाज बांधवांनी घरातच राहून जन्मोत्सव साजरा करावा, असे आवाहन छावाचे प्रदेश कार्याध्यक्ष इंजि. तानाजी हुस्सेकर यांनी केले. मागील वर्षाप्रमाणे याही वर्षी कोरोना असून, यावर मात करण्यासाठी घरातच राहून गर्दी न करता मोठ्या प्रमाणात छत्रपती संभाजीराजे जन्मोत्सव साजरा करावा. याशिवाय ज्यांना शक्य आहे त्यांनी आपल्या परीने महाराजांचे कौशल्य, चातुर्य व शौर्याचा लेखाजोखा आपल्या वॉलवर लिहावा किंवा ज्यांच्याकडे व्हिडिओ स्वरूपात माहिती आहे अशांनी फेसबुक, व्हाॅट्सॲपद्वारे शेअर करावी, असेही हुस्सेकर म्हणाले.
पत्नीचा खून करणारा पती कोठडीत
अर्धापूर : गाढ झोपेत असताना पत्नीचा खून करणारा पती काशीनाथ संभाजी आढाव याला न्यायालयाने तीन दिवस पोलीस कोठडीत पाठविले आहे.
११ मेच्या पहाटे ३ वाजता ही घटना गणपूर, ता.अर्धापूर येथे घडली. गोदावरी आढाव हिच्या चारित्र्यावर संशय घेऊन काशीनाथ तिला मारहाण करायचा. यातूनच त्याने डोक्यात लोखंडी सळईने वार करून तिचा खून केला होता. अर्धापूर पोलिसांनी काशीनाथविरुद्ध गुन्हा दाखल करून त्याला अटक केली. नांदेड न्यायालयात त्याला हजर केले असता न्यायालयाने काशीनाथला तीन दिवस पोलीस कोठडीत पाठवले.
उपविभाग मंजूर करण्याची मागणी
धर्माबाद : नांदेड जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागाचे त्रिभाजन होत आहे. नायगाव, मुदखेड येथे उपविभाग मंजूर झाला. धर्माबाद येथेही उपविभाग मंजूर करण्याची मागणी होत आहे. धर्माबाद तालुक्याला कोणी वाली नाही. वारंवार आमच्या तालुक्यावर अन्याय केला जातो असे निवेदन तिवारी यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पाठविले आहे.
माने यांची नियुक्ती
नायगाव : केदारवडगाव येथील नूतन ग्रामसेवक म्हणून एन.डी. माने यांची नियुक्ती झाली. या अगोदरचे एस.जे. वडजे यांची बदली करण्यात आली आहे. वडजे यांच्या कार्यपद्धतीवर आमदार राजेश पवार, जिल्हा परिषद सदस्या पूनम पवार यांनी गटविकास अधिकाऱ्यांकडे तक्रारी केल्या होत्या.
शिंपी कुटुंबाला धान्यवाटप
अर्धापूर : कोरोनामुळे शिंपी समाजावर उपासमार आली आहे. ही बाब लक्षात घेऊन शहरातील नवी आबादी, गवळी गल्ली, अमृतनगर भागात राहणाऱ्या शिंपी समाजाच्या आठ कुटुंबीयांना नांदेडमधील समाज बांधव संजीव तुंगेनवार यांनी धान्याचे वाटप केले. यावेळी मेरू शिंपी समाजाचे तालुकाध्यक्ष साईनाथ रामगीरवार, रुद्रा दळवी, उत्तम सूर्यवंशी, रवि श्रीरावार यांची उपस्थिती होती.