नांदेड - राज्यसभा निवडणुकीत आमचे मत मिळावे यासाठी महाविकास आघाडीने अजून आमच्याशी संपर्क केला नाही. त्यांना गरज असेल तर थेट संपर्क करावा असे आवाहन एमआयएम प्रमुख असदुद्दीन ओवेसी यांनी आज केले. त्यांनी संपर्क केला तर त्यांच्या उमेदवारांना मतदान करण्याचा विचार करू असे सांगून असदुद्दीन ओवेसी यांनी महाविकास आघाडीसोबत जाण्याचे संकेत दिले.
राज्यातील राज्यसभेच्या सहा जागांसाठी होणारी निवडणूक अत्यंत निर्णायक वळणावर असून भाजप आणि महाविकास आघाडी अपक्ष आणि छोट्या पक्षांचे मतदान खेचून आणण्याचा जोरदार प्रयत्न करत आहे. भाजप ऐनवेळी कोणता डाव टाकेल यामुळे महाविकास आघाडी सावध आहे. यामुळे प्रत्येक आमदाराच्या मताला किंमत आली आहे.
विधानसभेत १३ अपक्ष आमदार आहेत तर १६ छोट्या पक्षांचे आमदार आहेत. यात एमआयएमच्या दोन विधानसभा आमदारांचा समावेश आहे. ते कोणाच्या बाजूने मतदान करणार हे अद्याप स्पष्ट झाले नाही. दरम्यान, एमआयएम प्रमुख असदुद्दीन ओवेसी यांनी नांदेड येथे राज्यसभा निवडणुकीवर भाष्य केले. राज्यसभेसाठी गरज असल्यास महाविकास आघाडीने थेट संपर्क करावा, मतदान करण्याबाबत आम्ही विचार करू. त्यांनी ना आमच्या आमदारांशी संपर्क केला ना पक्ष नेतृत्वासोबत. दोन दिवसांत आमचा निर्णय आम्ही घेऊ असेही ओविसी यांनी जाहीर केले. अपक्ष आणि छोटे पक्ष ठरणार निर्णयक विधानसभेत १३ अपक्ष तर १६ छोट्या पक्षांचे आमदार आहेत. यापैकी बहुजन विकास आघाडी (३), समाजवादी पक्ष (२) , प्रहार जनशक्ती पक्ष (२), स्वाभिमानी शेतकरी संघटना (१) ,शेकाप (१) , क्रांतीकारी शेतकरी पक्ष (१ ), कम्युनिस्ट पक्ष (१) आणि ८ अपक्ष आमदार महाविकास आघाडीसोबत आहेत. महाविकास आघाडीकडे एकूण १६९ आमदार आहेत. तर भाजपबरोबर जनसुराज्य पक्ष (१), राष्ट्रीय समाज पक्ष (१) आणि ५ अपक्ष आमदार आहेत. त्यामुळे भाजपकडे ११३ आमदार आहेत. विशेष म्हणजे, मनसे आणि एमआयएम या दोन पक्षांचे ३ आमदार सत्तास्थापनेसाठी तटस्थ राहीले होते. दरम्यान, राज ठाकरे यांच्या बदलेल्या भूमिकेने तर मनसे आमदार भाजपकडे जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे एमआयएम काय भूमिका घेतो याकडे सर्वांच्या नजरा आहेत.