मंगळवारी होणाऱ्या या दीक्षांत समारंभाचे अध्यक्षस्थान विद्यापीठाचे कुलपती भगतसिंह कोश्यारी हे भूषविणार आहेत. यावेळी मुख्य अतिथी म्हणून उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत आणि मुंबई येथील टाटा इन्स्टिट्यूट ऑफ फंडामेंटल रिसर्च सेंटरचे संचालक प्रा. डॉ. एस. रामकृष्णन हे उपस्थित राहणार आहेत तसेच विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. उद्धव भोसले, प्र-कुलगुरू डॉ. जोगेंद्रसिंह बिसेन यांच्या उपस्थितीत हा सोहळा पार पडणार आहे.
या दीक्षांत समारंभासाठी ज्या विद्यार्थ्यांनी पदवी आवेदन पत्र सादर केलेले आहे, त्या विद्यार्थ्यांना पदवी प्रमाणपत्र त्यांच्या महाविद्यालयामध्ये आयोजित करण्यात येणाऱ्या पदवी वितरण कार्यक्रमामध्ये पदवी प्रमाणपत्र वितरीत करण्यात येणार आहेत. पीएच.डी. विद्यार्थी, विद्यापीठ परिसर, उप-परिसर, न्यू मॉडेल डिग्री कॉलेजच्या ज्या-ज्या विद्यार्थ्यांनी पदवी मिळण्यासाठी अर्ज केले आहेत, त्यांना १५ मे किंवा लॉकडाऊननंतर प्रत्यक्ष पदवी देण्यात येईल. याशिवाय विद्यार्थ्यांना आवश्यक असलेली सर्व माहिती विद्यापीठाच्या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आलेली आहे.
या दीक्षांत समारंभाचे विद्यापीठाच्या संकेतस्थळावर थेट प्रसारण करण्यात येणार असून विद्यार्थी, प्राध्यापक, प्राचार्य, संचालक, अधिकारी कर्मचारी यांच्यासह पालकांनी घरी बसून कार्यक्रमात सहभागी व्हावे, असे डॉ. वसंत भोसले यांनी म्हटले आहे.