नांदेड : कोरोना महामारीत सर्व व्यवहार ठप्प पडले आहेत. अनेकांचे रोजगार गेले आहेत. परंतु, त्याचा मद्यपींवर कोणताही परिणाम झाला नसल्याचे दिसून येत आहे. लॉकडाऊनच्या पाच महिन्यांत जिल्ह्यातील मद्यपींनी देशी अन् विदेशी मिळून तब्बल ५४ लाख ४८ हजार लिटर दारू ढोसली आहे. गतवर्षीच्या तुलनेत ही टक्केवारी कमी असली तरी जवळपास तीन महिने कडक लॉकडाऊन होता. त्यामुळे ही विक्री दोन ते अडीच महिन्यांतीलच आहे.
कोरोना महामारीने जगाला हैराण केले आहे. अद्याप कोरोनावर लस मिळाली नसून आतातर कोरोनाने रौद्र रुप धारण केले आहे. संसर्ग रोखण्यासाठी कडक लॉकडाऊन करण्यात आला. या काळात सर्वच व्यवहार बंद होते. लोकांच्या हातालाही काम नव्हते. दारूची दुकानेही बंद होती. परंतु लपूनछपून विक्री सुरूच होती. लॉकडाऊनमध्ये सूट दिल्यानंतर दारूविक्रीला परवानगी देण्यात आली. त्यासाठी राज्याच्या कमकुवत आर्थिक परिस्थितीचे कारण देण्यात आले.
सुरूवातीला काही तास दुकाने उघडण्यास परवानगी दिल्यानंतर खरेदीसाठी झुंबड उडाली होती. त्यामुळे नंतर दिवसभर दुकाने उघडे ठेवण्याची परवानगी देण्यात आली. त्यात एप्रिल ते आॅगस्ट या पाच महिन्यांत नांदेड जिल्ह्यात तब्बल ५४ लाख ४८ हजार ४२० लिटर देशी अन विदेशी दारूची विक्री झाली. त्यामध्ये ९ लाख १४ हजार ४९९ लिटर विदेशी तर ४५ लाख ७१ हजार ९२१ लिटर देशी दारू मद्यपींनी ढोसली. तर ८ लाख १९८४ लिटर बियर आणि ३ हजार २४७ लिटर वाईनची विक्री करण्यात आली.
गतवर्षीच्या तुलनेत विदेशी २७.७६ तर देशी दारूच्या विक्रीत २१.८० लिटर घट झाली आहे. वाईनच्या विक्रीत मात्र ७.१० टक्के वाढ झाली आहे. महसूल मिळण्याचे इतर सर्व मार्ग बंद झालेल्या राज्य शासनाला दारू विक्रीतून कोट्यवधी रुपयांचा महसूल मिळाला आहे. 54 लाख लिटर दारू लॉकडाऊनच्या पाच महिन्यांत ढोसली आहे. गतवर्षीच्या तुलनेत टक्केवारी कमी असली तरी जवळपास तीन महिने कडक लॉकडाऊन होता. त्यामुळे ही विक्री दोन ते अडीच महिन्यातीलच आहे. लॉकडाऊनमध्ये सूट दिल्यानंतर दारूविक्रीला परवानगी दिली.