कोरोनामुळे शाळा बंदच आहेत. त्यामुळे गेल्या दीड वर्षापासून मुले घरातच अडकून पडली आहेत. त्यात मैदानी खेळ आणि बाहेर कुठे फिरायला जाण्याचाही संबंध आला नाही. अगोदरच मोबाइल वेड असलेल्या मुलांसाठी ऑनलाइन शिक्षण ही जणू संधीच आली. त्यामुळे तासनतास मुले हातात मोबाइल घेऊन बसत आहेत. त्याचबरोबर दिवसभर चटपटीत खाणे आणि टीव्हीसमोर बसणे आलेच. त्यामुळे लहान मुलांच्या शरीराची ज्या प्रमाणात हालचाल होणे अपेक्षित असते, ती झालीच नाही. परिणामी कोरोनाच्या काळात मुलांचे वजन वाढतच गेले.
वजन वाढले कारण...
दीड वर्षापासून शाळा बंद असल्याने आणि लॉकडाऊनमुळे घरातच अडकून पडावे लागले. त्यात ऑनलाइन शिक्षण असल्यामुळे अनेक तास मुलांच्या हाती मोबाइल आला.
मोबाइल घेऊन एकाच ठिकाणावर ते बसून राहत आहेत. त्याचबरोबर चटपटीत खाणेही वाढले. अभ्यास फारसा नसल्याने टीव्हीसमोर बसून राहण्याचा वेळही वाढला. या कारणामुळे मुलांचे वजन वाढले.
लहान मुलांचे वजन कमी करण्यासाठी नियमितपणे व्यायाम करण्याची गरज आहे. त्याचबरोबर एकाच ठिकाणी जास्त वेळ बसून राहत असल्याचे निदर्शनास आल्यास त्यांना घरातल्या घरातच खेळ खेळण्यास प्रोत्साहन द्यावे. फास्ट फूडऐवजी घरचे जेवण, फळे यासह कच्च्या पालेभाज्या यावर भर द्यावा. कोल्ड्रिंक्स किंवा हॉटेलवरील पदार्थ शक्यतो टाळले पाहिजेत. मैदानी खेळ बंद असल्यामुळे मुलांना घराच्या अंगणातच खेळता येते काय, या दृष्टीनेही विचार करावा. जेणेकरून त्यांच्या शरीराची हालचाल वाढेल आणि खाल्लेले अन्न पचविण्यासाठी मदत होईल.