जिल्ह्यात कोरोनामुळे आतापर्यंत १ हजार ९०४ व्यक्तींचा मृत्यू झाला आहे. यात अनेक कुटुंबातील कमावती व्यक्ती मृत्युमुखी पडल्या आहेत. त्यामुळे अशा कुटुंबीयांसमोर दैनंदिन जीवनक्रम चालविण्यासाठी आव्हान उभे राहिले आहे. अशा गरजू कुटुंबीयांना त्यांच्या गरजेनुसार व पात्रतेच्या निकषानुसार शासनाच्या विविध विभागांच्या वेगवेगळ्या योजनांचा लाभ देण्यासाठी कार्यवाही करून सामाजिक बांधिलकीसोबतच संवेदनशील प्रशासनाचा प्रत्यय देणे गरजेचे असल्याचे जिल्हाधिकारी डॉ. विपीन यांनी स्पष्ट केले.
त्या अनुषंगाने कोरोनामुळे मृत्युमुखी पडलेल्या व्यक्तींच्या घरी भेट देऊन कुटुंबाची एकूण माहिती घ्यावी, गरजेनुसार आणि पात्रतेनुसार अशा कुटुंबांना कोणत्या योजनेचा लाभ देता येईल याबाबत माहिती घेऊन त्यांचे अर्ज घ्यावेत, ते अर्ज संबंधित विभागाला पाठवून पुढील कार्यवाही करावी, असे निर्देशही दिले आहेत. या सामाजिक बांधिलकीद्वारे घरातील कर्ती व्यक्ती गमावलेल्या कुटुंबाला पुन्हा उभे राहण्यासाठी उभारी देण्याची गरज असल्याचेही त्यांनी आदेशात नमूद केले आहे. उपविभागीय अधिकारी तसेच सर्व तहसीलदार यांना एका पत्राद्वारे कोरोना मयताच्या कुटुंबांना शासकीय योजनांचा लाभ देण्यासाठी पुढाकार घेण्याबाबत कळवले आहे.
शासनाच्या विविध योजनांचा लाभ गरजू कुटुंबांना प्रदान करण्यासाठी गावनिहाय कोरोना संक्रमणामुळे मृत्यू पावलेल्या व्यक्तींच्या कुटुंबीयांची भेट घ्यावी, कागदपत्रांची पूर्तता करून परिपूर्ण प्रस्ताव महसूल विभाग, महिला व बालविकास विभाग, समाज कल्याण अधिकारी यांच्याकडे सादर करावेत. यासाठी संबंधित मंडल अधिकारी, तलाठी व ग्रामसेवक यांचे पथक नियुक्त करावे. या पथकाने कुटुंबीयांची २८ जून रोजी भेट घेऊन ५ जुलैपर्यंत विविध योजनांचे प्रस्ताव संबंधित कार्यालयास सादर करावे, कोरोना संक्रमणामुळे मृत्यू पावलेल्या व्यक्तींच्या कुटुंबीयांना योजनेचा लाभ देऊन अहवाल करावा, असे आदेशही डॉ. विपीन यांनी दिले आहेत.