कोरोना संकटापूर्वी नांदेडच्या विमानतळावर प्रवाशांची गर्दी दिसून येत होती. सचखंड गुरुद्वाराच्या दर्शनासाठी विमानाने येणाऱ्या भाविकांचाही चांगला प्रतिसाद लाभला होता परंतु कोरोना संकटात विमानतळ दोन महिने बंद राहिले. त्यानंतर मेपासून ते टप्प्याटप्प्याने सुरू झाले. सध्या उड्डाण घेणाऱ्या विमानांच्या संख्येत अंशत: घट झाली आहे. जी विमान उड्डाण घेत आहेत. त्या विमानाला प्रवाशांचा चांगला प्रतिसाद मिळू लागला. त्यामध्ये एअर इंडियाची विमानसेवा दर मंगळवार, गुरुवार व शनिवार ही तीन दिवस नांदेड-अमृतसर-दिल्ली, टू-जेटची विमान सेवा दर मंगळवार, बुधवार व गुरुवार अशी तीन दिवस नांदेड-मुंबई, नांदेड-हैद्राबादकडे उड्डाण घेत आहे. एअर इंडिया विमानातील सीट क्षमता १६२ असून कोरोनाची पहिली लाट संपल्यानंतर सुमारे १४५ ते १५० प्रवासी विमानसेवेचा लाभ घेत होते. त्यामध्ये सचखंड गुरूद्वाराचे दर्शन घेण्यासाठी येणाऱ्या भक्तांचा चांगला प्रतिसाद मिळत होता; परंतु कोरोनाची दुसरी लाट सुरू झाल्यानंतर धार्मिक स्थळे बंद ठेवण्यात आल्याने भाविकांच्या संख्येत घट झाली आहे. सद्य:स्थितीत १६२ सीट क्षमता असलेल्या विमानातून केवळ २५ ते ३० प्रवासी प्रवास करत असल्याचे सांगण्यात आले.
कोरोनाचा प्रादुर्भावाचा विमानसेेवेलाही फटका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 24, 2021 4:17 AM