कोरोना विषाणू प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून कोरोना लसीकरणाच्या दुसऱ्या टप्प्याला सुरुवात करण्यात आली आहे. ज्येष्ठांसह ४५ वर्षे वयोगटावरील रुग्णांना या लसीकरणासाठी केंद्र शासनाच्या को-विन ॲपवर रजिस्ट्रेशन करावे लागणार आहे. याशिवाय स्पॉट रजिस्ट्रेशनची ही व्यवस्था ग्रामीण रुग्णालयात उपलब्ध करण्यात आली असून, दर दिवशी शंभर व्यक्तीच्या लसीकरणाचे नियोजन आहे. सदर लसीकरणासाठी ४५ ते ५९ वर्षे वयोगटातील इतर आजार असलेल्या व्यक्तींना जसे मधुमेह, हायपरटेंसी, मूत्रपिंड रोग, यकृत आजार, हृदयरोग, क्षयरोग, उच्च रक्तदाब, आदी आजार असलेल्या व्यक्तींना खासगी वैद्यकीय अधिकाऱ्यांकडून त्या आजाराचे प्रमाणपत्र लसीकरणासाठी उपलब्ध करून द्यावे लागत आहे, तर ६० वर्षे वयोगटातील व्यक्तीसाठी केवळ आधार, पॅन कार्ड दाखविले तरी लसीकरण देण्यात येत आहे.
लसीकरणाबाबत सर्वसामान्य नागरिकांत उत्सुकता असताना मात्र आता ज्येष्ठ नागरिकांना लसीकरणास सुरुवात झाली असून, तालुक्यातील तब्बल ९९२ जणांनी लस घेतली. ही मोहीम अशीच सुरू राहणार असून, जास्तीत जास्त लोकांना कोरोना लस दिल्या जाणार आहे. शहरासह तालुक्यातील ज्येष्ठ नागरिक तथा ४५ वर्षांवरील दुर्धर आजार असलेल्या नागरिकांना लसीकरणासाठी ऑनलाईन नोंदणी करून घ्यावी लागणार असून, सर्वांनी कोरोना विषाणू प्रतिबंधात्मक लसीबाबत भीती बाळगू नये व को-विन लसीकरण घेण्याचे आवाहन लखमावार यांनी केले.