नांदेड- सौदी अरेबियाच्या बेहरीन येथे कामासाठी गेल्या यानंतर परत देशात आलेल्या 25 वर्षीय तरुणाला कोरोना संशयित म्हणून नांदेडच्या शंकरराव चव्हाण शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
लोहा तालुक्यातील कळेगाव येथील तरुण कामानिमित्त काही महिन्यांपूर्वी बेहरीन येथे गेला होता. परंतु बेहरिन येथे कोरोनाची साथ मोठ्या प्रमाणात पसरल्याने त्याने मायदेशात परत येण्याचा निर्णय घेतला. बेहरिन येथे आतापर्यंत कोरोना चे 50 रुग्ण आढळले आहेत.रविवारी तो तरुण हैदराबाद येथे आला होता. त्यानंतर सोमवारी नांदेडमध्ये दाखल झाला. परंतु सर्दी आणि ताप असल्याने तो शासकीय रुग्णालयात दाखल झाला.
या ठिकाणी त्याची तपासणी केली असता कोरोनाचे लक्षणं आढळून आले. त्यामुळे त्याला कोरोनाच्या विशेष वॉर्ड मध्ये ठेवण्यात आले. त्याचे थुंकी अन इतर नमुने तपासणीसाठी पुणे येथील प्रयोगशाळा येथे पाठविण्यात आले आहेत. दरम्यान काही दिवसांपूर्वीच नांदेडमध्ये कोरोनाचा संशयित आढळला होता. परंतु तपासणी नंतर त्याचा अहवाल निगेटिव्ह आला होता. परंतु सदरील रुग्ण हा साथ पसरलेल्या बेहरिन येथून आलेला असल्याने आरोग्य यंत्रणा खडबडून जागी झाली आहे.