नांदेड :जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग वेगाने होत असून आता जिल्हा कारागृहातील तब्बल ८१ कैदी कोरोना बाधित झाले आहेत़ अँटीजेन तपासणीत त्यांचे अहवाल पॉझिटिव्ह आले़ त्यामुळे कारागृहातील इतर कैदी आणि अधिकाऱ्यांमध्ये भितीचे वातावरण पसरले आहे़
दररोज तिनशेहून अधिक कोरोना रुग्ण आढळून येत आहेत़ त्यात मृत्यूचा आकडाही वाढताच आहे़ अँटीजेन तपासणीत रुग्णाचा अहवाल त्वरित मिळत असल्यामुळे या तपासणीवर अधिक भर देण्यात येत आहे़ न्यायालयाच्या आदेशावरुन गेल्या दोन दिवसांपासून जिल्हा कारागृहातील कैद्यांची अँटीजेन तपासणी सुरु करण्यात आली होती़ या तपासणीत तब्बल ८० कैदी कोरोना बाधित निघाल्याने एकच खळबळ उडाली आहे़ सध्या कारागृहात २९१ कैदी आहेत़ न्यायालयीन कोठडीत असल्यामुळे त्यांना वेगवेगळ्या बराकीत ठेवण्यात आले आहे़ परंतु आता कोरोना बाधित निघाल्यामुळे कारागृहातीलच विलगीकरण कक्षात त्यांच्यावर उपचार सुरु करण्यात आले आहेत़ विशेष म्हणजे कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सात वर्षापेक्षा कमी शिक्षा असलेल्या शेकडो कैद्यांची न्यायालयाने यापूर्वीच जामीनावर सुटका केली आहे़ तसेच कारागृहात दाखल करण्यापूर्वी प्रत्येकाची आरोग्य तपासणी करण्यात येते़ त्यानंतरही कोरोनाने कारागृहात शिरकाव केला़
उपचारा दरम्यान कैदी पळून जाण्याच्या घटनाराज्यात अनेक ठिकाणी कैद्यांना कोरोनाची बाधा झाल्यानंतर त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते़ परंतु रुग्णालयातून बाधित कैदी पळून जाण्याच्या घटना घडल्या आहेत़ त्यातच नांदेडातील शासकीय रुग्णालयांमध्ये सध्या खाटाच शिल्लक नाहीत़ अशात या कैद्यांना तेथे कसे ठेवणार? त्यांना तेथे ठेवल्यास ते पळून जाण्याचीही दाट शक्यता आहे़ सध्या आढळलेल्या ८० कैद्यांमध्ये कुणाचाही प्रकृती गंभीर नसल्याची माहिती हाती आली आहे़