विद्यार्थ्यांना दरवर्षी मोफत देण्यात येणाऱ्या पाठ्यपुस्तकांचा प्रायोगिक तत्त्वावर पुनर्वापर करण्यात येणार आहे. जिल्ह्यात पहिली ते आठवीपर्यंत जि.प. शाळेत शिक्षण घेणाऱ्या १ लाख ९६ हजार ८१५ विद्यार्थ्यांना मोफत पुस्तकांचा लाभ देण्यात आला होता. शालेय विद्यार्थ्यांना गतवर्षी वाटप केलेल्या पाठ्यपुस्तकांपैकी अनेक विद्यार्थी पाठ्यपुस्तके योग्य रीतीने सांभाळून ठेवतात. त्यानुसार अधिकाधिक विद्यार्थ्यांकडून पाठ्यपुस्तकांचे संकलन करून त्याचे पुढील वर्गात जाणाऱ्या विद्यार्थ्यांना फेरवाटप करण्यात येणार आहे. पुस्तकांचा पुनर्वापर केल्यामुळे काही प्रमाणात कागदांची बचत होऊन पर्यावरणाची हानी टाळता येणार आहे. गतवर्षी शासनाने पाठ्यपुस्तकांच्या पुनर्वापराचा प्रकल्प सुरू केला आहे. ज्या शाळेत मोफत पाठ्यपुस्तके दिली जातात. त्या शाळांमधील विद्यार्थी, पालकांनी २०१९-२० व २०२०-२०२१ मध्ये वापरलेली पाठ्यपुस्तके शाळेतील मुख्याध्यापकांकडे जमा करावेत, असे आवाहन शिक्षणाधिकारी प्रशांत दिग्रसकर यांनी केले आहे. त्यानुसार काही शाळेवर पुस्तके जमा करण्यात आली आहेत. मात्र कोरोनाचा कहर सर्वत्र सुरू असल्याने या कामात अडथळा निर्माण होत आहे. ग्रामीण भागात कोरोनाचे रुग्ण मोठ्या संख्येने आढळत आहेत. त्यामुळे नागरिक घराबाहेर पडत नाहीत. अशा वेळी शाळेवर जाऊन पुस्तके परत करण्यास विद्यार्थी व पालक भीत आहेत. मात्र पुढील शैक्षणिक सुरू होण्यापूर्वी जुनी पुस्तके मोठ्या संख्येने विद्यार्थी परत करतील, अशी माहिती शिक्षणविस्तार अधिकारी व्यंकटेश चौधरी यांनी दिली.
चौकट- जनजागृतीची गरज
पुस्तकाच्या पुनर्वापरासाठी मोठ्या प्रमाणात जनजागृती करण्याची गरज आहे. दरवर्षी मोफत पुस्तके मिळत असल्यामुळे अनेक पालकांना मोठा आधार मिळतो. त्यामुळे शिक्षण विभागाने पुस्तकांच्या पुनर्वापरासाठी मोठ्या प्रमाणात जनजागृती केल्यास याचा विद्यार्थ्यांना फायदा होईल.
चौकट- शासनाने केलेल्या सूचनेप्रमाणे पुस्तके परत मागवली जात आहेत. त्यासंबंधीचे पत्रही पाठवण्यात आले आहे. त्यानुसार जिल्ह्यातील काही पालकांनी मागील वर्षीचे पुस्तके शाळांमध्ये जमा केले आहेत. मात्र नवीन शैक्षणिक वर्षात नवीन पुस्तके वाटप करताना जुनी पुस्तके मोठ्या प्रमाणात संकलित होतील. जुनी पुस्तके परत केल्यासच पुढच्या वर्गातील नवीन पुस्तके मिळतील. - प्रशांत दिग्रसकर, शिक्षणाधिकारी, जि.प. नांदेड.