नांदेड - नांदेडमध्ये रविवारी ५ नव्या कोरोना रुग्णाची नोंद झाली. यामध्ये पंजाब येथे जाऊन आलेल्या दोन चालकांचा, गुरुद्वारातील २ सेवादारांचा आणि जुन्या नांदेडातील रहमतनगर येथील एका महिलेचा समावेश आहे. विशेष म्हणजे सकाळीच अहवाल आलेल्या रहमतनगर येथील महिलेचा दुपारी मृत्यूही झाला. नांदेडमध्ये शनिवारी श्री लंगर साहिब गुरुद्वारातील २० सेवादारांचा कोरोना अहवाल पॉजिटीव्ह आला होता. त्यानंतर रविवारी सकाळी ३ अहवाल पॉजिटीव्ह आले. यात पंजाबला भाविकांना सोडण्यासाठी गेलेल्या २ खाजगी चालकांना आणि जुन्या नांदेडातील एका महिलेचा समावेश होता. ते २ वाहनचालक शासकीय रुग्णालयात आहेत. शहरातील एक खाजगी रुग्णालयात उपचार घेत असलेल्या रहमतनगर येथील ४८ वर्षीय महिलेला उपचारांसाठी शासकीय रुग्णालयात नेत असताना रविवारी दुपारी तिचा मृत्यू झाला. रहमतनगर येथे कंटेनमेंट झोनची प्रक्रिया सुरू होती. या महिलेला सारी आजाराची लागण झाल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे. त्यात कोरोनाची टेस्ट केली असता ती पण पॉजिटीव्ह आली.
नांदेडमध्ये आतापर्यंत कोरोनाचे तीन बळी गेले आहेत. कोरोना टेस्टचा दुसरा अहवाल रविवारी दुपारी आला. यामध्ये श्री लंगर साहिब गुरुद्वारामध्ये काम करणारे आणखी २ सेवादार पॉजिटीव्ह आढळले आहेत. जिल्ह्यातील तपासणी केलेल्या एकूण १ हजार १९९ पैकी ३१ रुग्णांचा अहवाल पॉजिटीव्ह आला आहे. १ हजार १२२ अहवाल निगेटिव्ह आले आहेत. १८ अहवालामध्ये निष्कर्ष निघाला नाही. ५ स्वबच्या तपासणीची गरज नसल्याचा निर्वाळा देण्यात आला होता. प्रशासनाने खबरदारी घेण्याचे आवाहन केले आहे.