मुखेड : संकटाच्या काळात जाती धर्माच्या पलीकडे जावून जकातच्या स्वरुपात गरजूंना मदतीचा हात दिला पाहिजे़ अशा आशयाचा संदेश येथील स्थानिक मौलाना हाफीज अब्दुल गफार यांनी दिल्यानंतर कष्टकरी १२ तरुणांनी आपापसात एकत्रित येवून निधी संकलित केला़ यातून मुखेड शहरातील २०० कुटुंबांना अन्नधान्यांच्या किटचे वाटप करण्यात आले़
याबाबत रियाज शेख यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी सांगितले की, शहरातील गरीब नवा मस्जीद येथील मौलाना हाफीज गफार यांनी संकट काळात मदतीसाठी पुढे येण्याचे आवाहन केले होते़ मौलानाचे हे मार्गदर्शन ऐकल्यानंतर आम्ही मित्रांनी एकत्रित येवून आपापसात निधी गोळा करण्याचा निर्णय घेतला़ त्यानुसार आमच्या ग्रुपमधीलच गाड्यावर फळे विकणारे दोन तरुण, रोजंदारीवर कामाला जाणारे तिघे, १ कापड व्यवसायिक, १ हॉटेल चालक आणि अन्य तिघे अशा दहा जणांनी आपल्या कुवतीनुसार योगदान देवून पैसे जमा केले़ त्यानंतर विदेशात असलेल्या दोन मित्रांनाही ही संकल्पना सांगितल्यानंतर त्यांनीही आॅनलाईनद्वारे मदत केली़
यातून साधारण १ लाखाचा निधी जमा झाला़ या निधीतून धान्य व इतर साहित्याची खरेदी केली़ ही माहिती येथील तहसिलदार काशिनाथ पाटील, पोलिस निरीक्षक नरसिंग आकोसकर, आणि मुख्याधिकारी त्र्यंबक कांबळे यांना दिल्यानंतर त्यांनी येवून आमच्याशी संवाद साधला़ तसेच त्यांच्या मार्गदर्शनाखाली पाच किलो तांदुळ, पाच किलो गहू, १ किलो तेल, १ किलो साखर आणि १ किलो मसूर डाळ अशा पाच वस्तूंचे २०० किट बनविण्यात आले़ त्यानंतर शहरातील अत्यंत गरजू असलेल्या नागरिकांची यादी तयार करुन या नागरिकापर्यंत ही मदत पोहंचविण्यात आल्याचे शेख यांनी सांगितले़
मदतीचा गाजावाजा नाहीमुखेड येथील या १२ तरुणांनी आपापसात निधी गोळा करुन २०० गरजूंना अन्नधान्यांची मदत केली़ विशेष म्हणजे मदतवाटपाचा एकही फोटो त्यांनी घेतला नाही़ गरजूंच्या यादीनुसार या ग्रुपमधील दोघेजण दुचाकीवरुन संबंधीतांच्या घरी जायचे, गरजूचा दरवाजा ठोठावल्यानंतर दरवाजा उघडताच दारासमोर किट ठेवून मदतीसाठी गेलेले हे दोघेही पुढच्या व्यक्तीसोबत कसलाही संवाद न करता परतायचे़ त्यामुळे मदत कोणी केली हेही त्या गरजूला माहित होवू नये याची दक्षता या ग्रुपमधील सदस्यांनी घेतली़