- श्रीनिवास भोसले
नांदेड : ‘कोरोना’चा धसका अनेकांनी घेतला आहे़ परंतु, ज्यांचे विवाह जुळले आहेत आणि मुहूर्तही पकडला आहे़ अशा लग्नाळू मंडळींनी आपला मुहूर्त टळू नये म्हणून ‘लॉकडाऊन’ ओपन होण्यासाठी सध्या देव पाण्यात ठेवले आहेत़ यंदा सर्वाधिक मुहूर्त असलेला मे महिना खाली जाईल, असेच सध्याचे चित्र आहे़
सोळा संस्कारांपैकी दोन मनांना एकत्र आणणारा आणि दोन कुटुंबं जोडणारा हा एक गोड संस्कार मानला जातो़ आपल्या वैवाहीक जीवनाची सुरूवात धुमधडाक्यात करण्याचे स्वप्न प्रत्येकाचे असते़ अशीच स्वप्न पाहणाºया हजारो लग्नाळू मंडळीच्या मुहूर्तामध्ये ‘कोरोना’ने विघ्न घातले आहे़ देशात लॉकडाऊन झाल्यानंतर सर्वच मंगल कार्यालयांना सील ठोकण्यात आले आहे़ जमावबंदी आदेश लागू झाला त्यामुळे आपसुकच लग्न व त्यासारखे सार्वजनिक सर्वच कार्यक्रम रद्द झाले
लग्न जुळल्यानंतर पाहुणे, मित्र मंडळी सर्वांना लग्नाला यायला जमले पाहिजे़ त्यांच्या साक्षीने हा सोहळा पार पाडता यावा म्हणून बहुतांश मंडळी उन्हाळी सुट्यांमध्ये म्हणजेच मे महिन्यातील मुहूर्तांना प्राधान्य देते़ परंतु, यंदा सर्वाधिक मुहूर्त असलेल्या मे आणि जून महिन्यालाही कोरोनाचा फटका बसेल असे सद्यस्थितीत दिसून येत आहे़
यंदा जवळपास ७८ मुहूर्त असून त्यापैकी सर्वाधिक २६ मुहूर्त हे मे आणि जून महिण्यात आहेत़ ज्या मंडळींनी घाई-गरबडीत शिमगा आणि पाडव्याच्या मध्य राखून लग्न मुहूर्त काढले़ त्यांचे चांगलेच फावले आहे़ परंतु, ज्यांचे लग्न जुळले आहे आणि मुहुुुर्त मे महिन्यात वा लॉकडाऊनच्या काळात आले़ त्या लग्नाळू मंडळींचा चांगलाच हिरमोड झाला आहे़
कोरोनाची परिस्थिती अनिश्चित असल्याने लग्नाची तारिख पुढे ढकलून बाकीची तयारी करता येईल, असेही चित्र नसल्याने वधु पित्यांची दमछाक होत आहे़ मंगल कार्यालय, वाजंत्री, मंडप, आचारी, गायन संच यासह सर्वांनाच लग्नाची सुपारी दिली आहे़ त्यामुळे सदर तारीख लांबवून पुन्हा नव्या तारखांमध्ये उपरोक्त मंडळी वा मंगल कार्यालये उपलब्ध होतात की नाही, अशी चिंताही वधुपित्याला लागली आहे़ अशा परिस्थिती मात्र उपवर-वधू छोटेखानी लग्न करण्यास नकार देत आहेत़विवाहासाठी तब्बल ७८ मुहुर्त; पण यंदा कोरोनाचे विघ्ऩ़़
विवाहासाठी यंदा तब्बल ७८ मुहूर्त असल्याने वधूवरांच्या पालकांनी सोयीचे मुहूर्त पकडले़ परंतु, त्यात कोरोनाने विघ्न घातले़ अनेकांनी मंगल कार्यालय, कॅटर्स, डेकोरेशन बुकिंग केले आहे़ परंतु, एप्रिल, मे महिन्यातही मोठ्या लग्नांना परवानगी दिली जाईल की नाही, याबाबत शाशंकताच आहे़ . मे महिन्यात ४, ७, ८, ९, १२, १४, १६, १७, १९, २१, २२, २३, २७, ३१ जून महिन्यात: २, ३, ५, ६, ८, १०, १२, १५, १७, १८, १९, २०, २८ तर जुलैमध्ये १, २, ३ तारखेपर्यंत मुहूर्त आहेत़ १४ एप्रिलपर्यंत लॉकडाऊन आहे़ त्यानंतर १७, १९, २० आणि २१ एप्रिल रोजी अनेकांनी लग्न मुहूर्त काढलेले आहेत़