नांदेड : जिल्ह्यात कोरोनाचा विळखा दिवसेंदिवस अधिक घट्ट होत आहे. मंगळवारी १४ तर बुधवारी १७ रुग्ण आढळून आल्यानंतर आज गुरुवारी सकाळीच आणखी पाच रुग्णांची यात भर पडल्याने जिल्ह्यातील एकूण बाधित रुग्णांची संख्या ३९७ वर जावून पोंहचली आहे.
गुरुवारी सकाळी स्वॅब तपासणी नमुन्यांचे २८ अहवाल प्राप्त झाले. यातील १४ अहवाल निगेटिव्ह आले तर पाच अहवाल पॉझिटिव्ह आढळले. या नव्या पाच रुग्णांमध्ये चार जण नांदेड शहरातील तर एक जण मुखेड तालुक्यातील बेटमोगरा येथील आहे. नांदेड शहरात निजाम कॉलनी परिसरात साठ वर्षीय महिला बाधित आढळली आहे. याबरोबरच खुदबईनगर येथील एका चाळीस वर्षीय महिलेचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. तर जुन्या मोंढ्यातील एक छतीस वर्षीय पुरुष कोरोनाबाधित असल्याचे स्पष्ट झाले आहे. बेटमोगरा येथील ३० वर्षीय पुरुषालाही कोरोनाची बाधा झाली असून या चौघांचे अहवाल प्राप्त होताच यंत्रणेने त्यांच्या संपर्कात आलेल्यांचा शोध सुरू केला आहे.
आठ दिवसात ८२ रुग्णमागील आठ दिवसात कोरोनाबाधितांची संख्या झपाट्याने वाढल्याने नांदेडकरांच्या चिंतेत भर पडली आहे. मागील आठ दिवसात कोरोनाचे तब्बल ८२ रुग्ण आढळून आले आहेत. २५ जून रोजी पाच रुग्ण आढळले होते. त्यानंतर २६ आणि २७ जून या दोन दिवसात प्रत्येकी १७ रुग्णंची भर पडली. २८ जून रोजी पुन्हा दोन रुग्ण आढळले तर २९ जून रोजी ६ रुग्णांची भर पडली. ३० जून रोजी १४ बाधित आढळून आले. तर काल बुधवारी १७ रुग्ण आढळल्यानंतर आज गुरुवारी सकाळीच यामध्ये आणखी पाच नव्या रुग्णांची भर पडली.