नांदेड : मागील आठवडाभरापासून कोरोनाबाधीतांची संख्या वेगाने वाढत आहे़ सोमवारी ६ रुग्णांची भर पडल्यानंतर मंगळवारही नांदेडकरांची चिंता वाढविणाराच ठरला़ मंगळवारी एकाच दिवसात जिल्ह्यात २४ बाधित रुग्ण आढळून आल्याने जिल्ह्यातील एकूण पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या २८६ वर पोहोंचली आहे़ विशेष म्हणजे नव्याने आढळलेल्यापैकी १३ बाधीत हे बँक कर्मचाऱ्यांच्या संपर्कातील आहेत.
सोमवारी रात्री उशिरा ११८ स्वॅब नमुन्यांचे तपासणी अहवाल प्राप्त झाले़ यातील तब्बल १११ अहवाल निगेटिव्ह आले़ तर ४ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आढळले़ हे सर्व चारही जण मुखेड शहरातील आहेत़ यातील तिघेजण हे विठ्ठल मंदिर परिसरातील असल्याचे स्पष्ट झाले़ या अहवालापाठोपाठ मंगळवारी दुपारी नांदेड शहरातील आणखी १४ जणांचे पॉझिटिव्ह अहवाल प्राप्त झाले़ तर सायंकाळच्यासुमारास प्राप्त झालेल्या अहवालांपैकी आणखी ६ अहवाल पॉझिटिव्ह आल्याने नांदेडमध्ये एकाच दिवसात विक्रमी २४ रुग्ण आढळून आले़ अद्यापही २२० जणांचे स्वॅब तपासणी अहवाल अनिर्णित आहेत़ आजवर १८० जण कोरोनामुक्त झाले असून, या सर्वांना रुग्णालातून सुट्टी देण्यात आली आहे़ तर जिल्ह्यातील विविध कोविड केअर सेंटरमध्ये सध्या ९३ रुग्णांवर उपचार सुरु असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ़ निळकंठ भोसीकर यांनी दिली.