नांदेड (प्रतिनिधी) कोरोनाच्या सावटाने सर्वच जण आज घरात आहेत़ अशा परिस्थितीत कोरोनाशी लढा देवून देश वाचविण्यासाठी अहोरात्र परिश्रम घेत असलेल्या ‘कोरोना’ योद्ध्यांबद्दल स्पर्धकांनी चित्ररेखाटनांच्या माध्यमातून कृतज्ञता व्यक्त केली़
निमित्त होते आनंदवन मित्र परिवाराने आयोजित केलेल्या आॅनलाईन चित्रकला स्पर्धा़ महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून आनंदवन मित्र परिवार, नांदेड आयोजित चित्रकला स्पर्धेत देशभरातून १८० जणांनी अर्ज केले होते़. त्यापैकी ८० स्पर्धकांनी आॅनलाईन व्हॉटसअपच्या माध्यमातून आयोजकांच्या शर्ती अटीनूसार चित्र पाठविले होते़ त्यापैकी तिघांची निवड करण्यात आली़ यामध्ये प्रथम १०,००१ रूपयांचे पारितोषिक ऋषिकेश संतोष खानजोडे रा. रिसोड जिल्हा वाशीम यांना, द्वितीय ७ हजार १ रूपयांचे बक्षीस रवींद्र वाकळे रा. औरंगाबाद आणि अमोल प्रभाकर सालमोठे रा. वसमत, जि़ हिंगोली यांच्यामध्ये विभागून देण्यात आले़ तर तृतीय बक्षीस प्रेरणा दामोदर टाकळगावकर रा. सिडको, औरंगाबाद यांना देण्यात आले़ एकासरस एक संकल्पना राबवून कोरोनाच्या लढ्यात सहभागी डॉक्टर, वैद्यकीय कर्मचारी, पोलीस, महसूल व इतर सर्व अधिकारी, कर्मचाऱ्यांविषयी कतृज्ञता व्यक्त केली़ त्याचबरोबर अनेकांनी कोरोनाचा सामना करण्यासाठी जनजागृतीपर चित्रही रेखाटले़ स्पर्धेत सहभागी सर्व स्पर्धकांच्या चित्रांचे चित्रकला क्षेत्रातील दोन दिग्गज परीक्षकांनी परीक्षण करून गुण दिले़ त्यानूसार सदर विजेत्यांची निवड करण्यात आल्याची माहिती आनंदवन मित्र परिवारने दिली़
डॉक्टर अन् पोलिसच देशाचे कवचआपली माणसं आणि पर्यायाने आपला देश वाचविण्यासाठी स्वत:च्या जीवाची पर्वा न करता २४ तास अहोरात्र कष्ट उचलणाऱ्या डॉक्टर, पोलिस आणि सर्व यंत्रणांच्या कार्यावर प्रकाश टाकणाऱ्या एकासरस एक कलाकृती स्पर्धकांनी सादर केल्या आहेत़ डॉक्टर, पोलिस आणि शासन, प्रशासनाच्या खांद्यावरील वाढता ताण लक्षात घेवून आपण घरातच थांबून त्यांना मदत करूया, असा संदेश देणारी कलाकृतीही मनाला भावणारी आहे़ त्याचबरोबर कोरोनाच्या भयंकर राक्षसास रोखण्यास सज्ज असलेला सफाई कामगार, पोलीस, डॉक्टर यांच्याविषयी रेखाटलेली कलाकृती सदर यंत्रणेला पाठबळ देण्याचा संदेश देते़