नांदेड : मंगळवारी दिवसभरात जिल्हयात कोरोनाचे १४ रुग्ण आढळून आले होते. त्यानंतर बुधवारी सकाळीही आणखी चार बाधित आढळल्याने नांदेडमध्ये कोरोनाचा विळखा अधिक घट्ट होत असल्याचे चित्र आहे. या नव्या चार रुग्णांमुळे जिल्ह्यातील एकूण बाधितांची संख्या ३९१ झाली आहे.
मंगळवारी दिवसभरात १४ रुग्ण आढळले होते. त्यात चारजण शहरातील असर्जन भागातील, बाफना व आंबेडकरनगरचे प्रत्येकी दोन तर विनायकनगर व वसंतनगर येथील प्रत्येकी एक तर मुक्रमाबाद येथील २ आणि हदगाव आणि मुखेड तालुक्यातील प्रत्येकी एक रूग्ण आढळले होते.
बुधवारी सकाळी स्वॅब नमुण्यांचे १५ अहवाल प्राप्त झाले. यातील चार अहवाल पॉझिटिव्ह आले. यात एक ६५ वर्षीय बाधित महिला कंधार तालुक्यातील सोमठाणा उम्रज येथील आहे. तर उर्वरीत तीन बाधित महिला नांदेड शहरातील आहेत. यामध्ये इतवारा, गाडीपुरा भागातील ५४ वर्षीय महिला, आनंदनगर रोड, देना बँकेजवळील एक ३६ वर्षीय महिला आणि अनिकेतनगर भावसार चौक येथील एका ६५ वर्षीय महिलेचा समावेश आहे.