नांदेड :जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग दिवसेंदिवस वाढतच आहे़ मंगळवारी सायंकाळी आलेल्या अहवालानुसार आणखी २६ नव्या रुग्णांची त्यात भर पडली आहे़ त्यामुळे आजघडीला कोरोना रुग्णांची संख्या ४८४ वर पोहचली आहे़ तर मंगळवारी कोरोनामुळे दोघांचा मृत्यू झाला आहे़ त्यामुळे कोरोना बळींचा आकडा २२ वर गेला आहे़ त्यातच १६ रुग्णांची प्रकृती चिंताजनक असल्याचे प्रशासनाकडून कळविण्यात आले आहे़ त्यामुळे नांदेडकरांच्या चिंतेत वाढ झाली आहे़
सोमवारी दुपारपर्यंत जिल्ह्यात कोरोनाचे ४४७ रुग्ण आढळले होते़ त्यानंतर रात्री आणखी ११ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आल्याने रुग्णसंख्या ४५८ वर पोहचली होती़ तर कोरोनामुळे मृत्यूंचा आकडा २० होता़ सोमवारी रात्री इतवारा भागातील धनगर टेकडी येथील एका ८३ वर्षीय वृद्धाचा कोरोनामुळे मृत्यू झाला़ तर बळीरामपूर येथील ६० वर्षीय वृद्धाला रविवारी उपचारासाठी दाखल करण्यात आले होते़ मंगळवारी सकाळी या रुग्णाचाही मृत्यू झाला़ या दोन्ही रुग्णांवर विष्णूपुरी येथील डॉ़शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात उपचार सुरु होते़ त्यामुळे कोरोना बळींची संख्या २२ वर पोहचली आहे़ या दोन्ही रुग्णास उच्च रक्तदाब, श्वसनाचा त्रास आणि मधुमेह आदी आजार होते़ मंगळवारी सायंकाळी प्रशासनाला १०२ जणांचे अहवाल प्राप्त झाले होते़ त्यामध्ये २६ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले असून ६७ जण हे निगेटिव्ह आले आहेत़ त्यामुळे जिल्ह्यात एकुण रुग्ण संख्या ४८४ वर पोहचली आहे़
मंगळवारी पंजाब भवन येथील एका रुग्णाला सुट्टी देण्यात आली आहे़ आतापर्यंत ४५८ पॉझिटिव्ह रुग्णापैकी ३३५ जणांना घरी पाठविण्यात आले आहे़ आजघडीला १०१ पॉझिटिव्ह रुग्णांवर उपचार सुरु असून त्यात ९ महिला आणि ७ पुरुष अशा १६ जणांची प्रकृती गंभीर आहे़ गेल्या २४ तासात गंभीर प्रकृती असलेल्या रुग्णांमध्येही वाढ झाली आहे़ डॉ़शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात ४२, पंजाब भवन कोविड सेंटरमध्ये ४०, मुखेड २, हदगांव १, जिल्हा रुग्णालयात ३, बिलोली ६, हिमायतनगर २, मुदखेड १ तर शहरातील एका खाजगी रुग्णालयात १ रुग्ण उपचार घेत आहे़ २ रुग्णांना औरंगाबाद येथे संदर्भित करण्यात आले आहे़.