नांदेड : शहरातील तापाच्या रुग्णांची तपासणी आता शहरातील कोरोना केअर सेंटरमध्येच करण्याचा निर्णय महापालिकेने घेतला असून, मनपाच्या इतर १४ रुग्णालयामध्येही तापाचे रुग्ण न तपासण्याचे आदेश दिले आहेत़
कोरोनाचा प्रादूर्भाव रोखण्यासाठी विविध उपाययोजना केल्या जात आहेत़ महापालिकेचे आयुक्त डॉ़ सुनील लहाने यांनी प्रारंभी शहरातील १२ रुग्णालयामध्ये ताप, खोकला व सर्दीचे रुग्ण स्वतंत्रपणे तपासण्याचे निर्देश दिले होते़ जिल्हा कोरोनाच्यादृष्टीने ग्रीन झोनमध्ये आहे़ यापुढेही तो कायम रहावा यासाठी आता महापालिकेसह प्रशासनाकडूनही जादा खबरदारी घेतली जात आहे़
महापालिकेने आता शहरामध्ये तीन कोरोना केअर सेंटर सुरु केले आहेत़ त्यामध्ये चिखलवाडी भागातील एऩआऱआय़ निवास, विनायकनगर येथील महापालिका रुग्णालय आणि शिवाजीनगर येथील नाना-नानी पार्कचा समावेश आहे़ या ठिकाणी कोरोनाच्या संशयित रुग्णांचे विलगीकरण केले जात आहे़ त्यांना तेथे १४ दिवस क्वारंटाईन केले जात आहे़ याच कोरोना केअर सेंटरमध्ये आता शहरातील तापीचे रुग्ण तपासले जाणार आहेत़ महापालिकेचे वैद्यकीय अधिकारी या ठिकाणी उपस्थित राहणार असून, इतर आजारासाठी मनपाच्या १२ रुग्णालयात उपचार मिळतील़ एखाद्या संशयिताकडून कोरोनाचा प्रादूर्भाव इतरांना होवू नये या दृष्टीने ही खबरदारी घेण्यात आल्याचे आयुक्त डॉ़ सुनील लहाने यांनी सांगितले़
दरम्यान, मंगळवारी शहरातील एनआरआय निवास येथील कोरोना केअर सेंटरला आयुक्त डॉ़ लहाने यांनी भेट दिली़ यावेळी वाराणसी येथील परतलेले ५० प्रवासी आणि तामिळनाडूतील पाच मजूर या ठिकाणी क्वारंटाईन केलेले होते़ येथे २४ तासासाठी वैद्यकीय पथक तैनात करण्यात आले असून, एका डॉक्टरांसह आठ कर्मचारी उपस्थित आहेत़ क्वारंटाईन केलेल्या प्रत्येकाची आरोग्य तपासणी दोन वेळा केली जात असून, कोरोनाच्या अनुषंगाने कोणतेही लक्षणे आढळल्यास त्यांना शासकीय रुग्णालयात पुढील उपचारासाठी वर्ग करण्यात येणार आहे़ वारासणीहून परतलेल्या ५० भाविकांचे स्वॅब घेण्यात आले आहेत़ हे स्वॅब आल्यानंतर जिल्ह्यातील भाविकांना घरी जाण्याची परवानगी दिली जाणार आहे़
सहा खाजगी रुग्णालयांचे अधिग्रहण
जगभरासह राज्यात थैमान घालणाºया कोरोनाच्या संकटामुळे आरोग्य यंत्रणेची चांगलीच धावपळ उडाली आहे़ उपलब्ध असलेली शासकीय रुग्णालये अपुरी पडत आहेत़ सुदैवाने नांदेड जिल्ह्यात आतापर्यंत कोरोनाचा एकही पॉझिटिव्ह रुग्ण आढळला नाही़ परंतु खबरदारीचा उपाय म्हणून जिल्हा प्रशासनाने शहरातील सहा खाजगी रुग्णालयांचे अधिग्रहण केले आहे़ ही रुग्णालये आणि तेथील मनुष्यबळाचा कसा वापर करावयाचा याचा निर्णय आता जिल्हा प्रशासन घेणार आहे़
कोरोनाच्या वाढत्या संसर्गामुळे अनेक मोठ्या शहरांमध्ये रुग्णालय उभारणीच्या कामांना वेग आला आहे़ नांदेड जिल्ह्यात आतापर्यंत कोरोनाचा एकही रुग्ण नसला तरी, संशयित मात्र दररोज सापडत आहेत़ आजघडीला विष्णूपुरी येथील डॉ़शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय तसेच श्री गुरु गोविंदसिंघजी शासकीय रुग्णालय या दोन ठिकाणी संशयित रुग्णांना ठेवण्यात येत आहे़ याच ठिकाणाहून त्यांचे नमुने तपासणीसाठी पाठविण्यात येत आहेत़ त्याचबरोबर महात्मा फुले जनआरोग्य योजनेअंतर्गत असलेल्या दहा रुग्णालयांमध्येही कोरोना रुग्णांसाठी खाटा राखीव ठेवण्यात आल्या आहेत़ परंतु भविष्यात कोरोनाचा संसर्ग वाढल्यास खबरदारीचा उपाय म्हणून जिल्हा प्रशासनाने शहरातील सहा खाजगी रुग्णालये अधिग्रहित केली आहेत़ त्यामध्ये विठाई, आश्विनी, संजीवनी, लाईफ केअर अभ्यूदय, यशोसाई आणि ग्लोबल हॉस्पीटलचा समावेश आहे़ या रुग्णालयात कोरोना बाधीत रुग्णांवर औषधोपचार करण्यात येणार आहे़ सदरील रुग्णालय आणि तेथील मनुष्यबळ याबाबत आता जिल्हा प्रशासन निर्णय घेणार आहे़