नांदेड: मागील १३ दिवसात १०० रुग्ण आढळल्याने जिल्हयात कोरोनाचा विळखा वाढत आहे. शनिवारी नवे २२ रुग्ण आढळले होते. यातील तब्बल २० रूग्ण हे एका बँकेचे कर्मचारी असून ते शहराच्या विविध भागातील असल्याने कोरोनाने पहिल्यांदाच शहराच्या विविध भागात शिरकाव केला आहे. याच बाधित कर्मचाऱ्यांच्या संपर्कातील व्यक्तींचे शनिवारी स्वॅब घेण्यात आले असून, सदर अहवाल आज रविवारी सायंकाळी मिळणार असल्याने या अहवालांकडे नांदेडकरांचे लक्ष लागले आहे.
मे महिन्यामध्ये रुग्ण आढळण्याचे प्रमाण कमी झाले होते. दूसरीकडे उपचारानंतर सुट्टी मिळणाऱ्या रूग्णांची संख्या वाढत जात असल्याने नांदेडची वाटचाल पुन्हा ग्रीनझोनकडे होत असल्याचे वाटत असतानाच जूनच्या दूसऱ्या आठवड्याने नांदेडकरांची चिंता वाढविली. मागील चार दिवसात तब्बल ६३ नवे रूग्ण आढळले. त्यातही शनिवारी निघालेल्या २२ रुग्णांपैकी तब्बल २० बाधित हे एकाच बँकेचे कर्मचारी असून ते शहराच्या विविध भागातील रहिवासी असल्याने शहराला कोरोनाने वेढा घातल्यासारखी परिस्थिती झाली आहे.
शनिवारी बाधित निघालेल्या या २२ रुग्णांच्या संपर्कात आलेले आणखी किती जण आहेत. याचा शोध घेत या सर्वांचे स्वॅब नमुणे शनिवारी तपासणीसाठी पाठविले असून आज रविवारी सायंकाळ पर्यंत सदर अहवाल अपेक्षित असल्याचे जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. निळकंठ भोसीकर यांनी सांगितले.