- श्रीनिवास भोसलेनांदेड : रखरखत्या उन्हात दिवसभर मार्गक्रमण करत अमावस्येच्या रात्रीच्या काळोखात दाही दिशा हरवलेल्या असताना रानावनातून गावचा रस्ता शोधत सहा कुटुंबं तीन दिवसांपासून आपल्या लेकराबाळासह रात्रंदिवस पायपीट करत आहेत़ गुरूवारी पहाटे जवळपास २२ जण नांदेडमार्गे ते उमरखेडकडे रवाना झाले आहेत़
यवतमाळ जिल्ह्यातील उमरखेड तालुक्यातील जवळपास सहा कुटुंबं पोटाची खळगी भरण्यासाठी परळीत वीटभट्टी कारखान्यावर कामाला आहेत़ रोजमजूरी करून जगणारे ही स्थलांतरित कुटुंबं आज ‘कोरोना’ महामारीच्या आपत्तीचे शिकार बनले आहेत़ कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी देश लॉकडाऊन केला आहे़ परिणामी वाहतूक व्यवस्था बंद असल्याने अनेक कामगार, विद्यार्थी, नोकरदार आपल्या घरापासून कोसोदूर अडकून पडले आहेत़ १४ एप्रिलनंतर लॉकडाऊन शिथील होवून गावी जाता येईल म्हणून कामगारांनी परळीच्या वीटभट्टीवरच मुक्काम ठोकला़ परंतु, लॉकडाऊन वाढला आणि दिवसेंदिवस उचल घेवून डोक्यावर मालकाच्या पैशाचे ओझे होवू नये म्हणून कामगारांनी आपल्या कुटुंबासह पायी उमरखेड गाठण्याचा निश्चय केला आणि त्यांचा हा प्रवास तीन दिवसांपूर्वी सुरूही झाला़ बीड आणि परभणी जिल्ह्यातून ते नांदेडात पोहोचले आहेत़ सदर कामगारांनी आजपर्यंत प्रवास पोलीस अन् जिल्हा प्रशासनाला चकवा देत नव्हे तर रानावनातून कष्टकरी, शेतकऱ्यांच्या सहानुभूतीतून मिळणाऱ्या मदतीने पार केला़ रात्रंदिवस नदी, नाल्या अन् रानावनातून प्रवास करीत बीड, परभणी, नांदेड, हिंगोली, यवतमाळ अशा चार जिल्ह्यांच्या सीमा भेदून जवळपास २० ते २२ जणांचा हा जत्था शनिवारी अथवा रविवारी पहाटे त्यांच्या घरी पोहोचेल, अशी अशा त्यांना आहे़ दरम्यान, गावी गेल्यावर आम्ही डॉक्टरांकडून समद्यांची तपासणी करून घेणार आणि कोणीही घराबाहेर पडणार नसल्याचे कामगार निरागसपणे सांगत आहेत़
डोक्यावर ओझे अन् हातात पाणीलहान मुलं-मुली सोबत असल्याने दोन वेळ पोटाची भुक भागवेल अशी शिदोरी, मुक्कामाला लागणारे अंथरून आणि गरजेच्या वस्तूचे गाठोडे डोक्यावर अन् हातामध्ये पिण्याच्या पाण्यासाठी दहा, वीस लिटरच्या कॅन असे चाळीस ते पन्नास किलोचे ओझे घेवून वीटभट्टी कामगारांचा थक्क करणारा प्रवास सुरू आहे़
पैसे घ्या पर वाहनातून सोडाजवळपास सव्वाशे किलोमिटर पायपीट करून थकलेल्या एका महिलेने साहेब पायात जीव नाही राहिला हो लागल तेवढं पैसे घ्या पर आम्हाला आमच्या गावी सोडा, अशी हात जोडून विनवणी एका वाहनधारकाकडे केली़ पायपीट करणाऱ्यांमध्ये महिला-मुलांची संख्या अधिक आहे़ थकल्याने झाड आलं की महिला-मुलं जागेवरच बसत आहेत़
लेकराच्या पायाचं सालटं चालय़़़सरकारनं आम्हाला गावी सोडण्याची तेवढी व्यवस्था केली असती तर फार उपकार झालं असतं साहेब, चालून चालून लेकरांच्या पायाचं सालटं चालय ते पाहवं वाटणा गेलंय़ पण माय अन् बापाच्या डोक्यावर गाठोडे पाहून लेकरं बी मुकाट्यानं पाय फरकत फरकत का होईना, मागे मागे यायलेत, देव जाणं कुठं शेवट होणार? हे शब्द सव्वासे किलोमिटरचा प्रवास करून त्राण हरवलेल्या याच कुटुंबातील एका महिलेचे आहेत़
माणुसकी जीवंत हाय साहेबवाटेत कोणी अडवलं नाही का, असा प्रश्न उपस्थित केल्यानंतर साहेब आणखी माणुसकी जीवंत हाय़़़ असे उत्तर गणेश यांनी दिले़ कोणाला त्रास होवू नये म्हणून आम्ही आडरानानं गावाकडं जातोय़ विचारल्याबिगर कोणाच्या विहिरीचे पाणीदेखील घेत नाही, पण अनेकजण आमची मदत करत आहेत़ पाय दुखू लागल्याने एका डॉक्टरने सगळ्यांना गोळ्या दिल्या़ तर एका शेतकऱ्याने त्याची भाजी- भाकरी आम्हाला दिल्या़ नांदेडात एका आजोबाने मुलांना बिस्कीट, ब्रेडचे पुडे घेवून दिले़ तर एका महिलेने घरातून चिवडा, बिस्कीट अस खूप काही बांधून दिलं़ आम्ही चार हात दूर ठेवून हे सगळं घेत आहोत़ आम्हाला बिमारी नाही, पण सगळे सांगतात म्हणून दूर राहूनच बोलत असल्याचेही गणेश यांनी सांगितले़