नांदेड : शहरात कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत असून मंगळवारी लंगर साहिब येथील १० जणांना कोरोना झाल्याचे स्पष्ट झाले आहे. त्याचवेळी मुंबईहून परतलेल्या मुदखेड तालुक्यातील बारड येथील एका तरुणाचा कोरोना अहवाल पॉझीटीव्ह आला आहे. मंगळवारी एकाच दिवशी नांदेड जिल्ह्यात ११ कोरोना रुग्ण आढळले आहेत.
नांदेड जिल्ह्यात सोमवारपर्यंत कोरोनाचे ५२ रुग्ण आढळून आले होते़ त्यापैकी पाच जणांचा मृत्यू झाला आहे़ मंगळवारी त्यामध्ये नांदेड येथील लंगर साहिब गुरुद्वारातील दहा तर बारडच्या एका रुग्णाची भर पडली असून कोरोनाग्रस्तांची संख्या आता ६३ झाली आहे़ दहा रुग्ण लंगर साहिब गुरुद्वारातील आहेत तर एक रुग्ण हा बारड येथील असून तो तरुण आणि काही महिला मुंबई येथून पायी चालत आले होते़ बारड येथे आल्यानंतर या तरुणासह इतरांना क्वारंटाईन करण्यात आले होते़ या तरुणाचा अहवाल मंगळवारी पॉझिटिव्ह आला़ नांदेडची रुग्णसंख्या आता ६३ एवढी झाली आहे़
दरम्यान नांदेडमध्ये पंजाबहून परत आलेला एक वाहनचालक कोरोनामुक्त झाला आहे. २६ एप्रिल रोजी तो कोरोना पॉझीटीव्ह आढळला होता. उपचारानंतर त्याच्या दोन स्वॅब घेण्यात आले. ते निगेटीव्ह आल्यानंतर मंगळवारी रात्री विष्णूपुरी येथील शासकीय रुग्णालयातून त्याला घरी सोडण्यात आले.