नांदेड : काही दिवसांपूर्वी कोरोना संक्रमित लोकांना प्रोत्साहित करण्यासाठी बॉलीवूड मधील सर्व दिग्गज कलाकारांनी आपापल्या घरातून एक व्हिडिओ शूट करून 'मुस्कुराएगा इंडिया' हे गाणं तयार केले होते. यामध्ये अक्षय कुमार, आयुष्मान खुराना, टाइगर श्रॉफ, कार्तिक आर्यन, अनन्या पांडे, कृति सेनन, तापसी पन्नू आणि राजकुमार राव यांच्या सारखे सेलिब्रिटी आहेत. असाच एक व्हिडिओ महाष्ट्रातील युवक आणि युवतींनी तयार केला आहे.
३ मे पर्यंत लॉकडाऊन वाढवण्यात आल्यानंतर घरात बसून अनेकजण वेगवेगळ्या क्रीटीव्हिटी करून आपला वेळ घालवत आहेत. 'मुस्कुराएगा इंडिया' हे गाणं सर्वत्र व्हायरल झाल्यानंतर या गाण्यावर वेगवेगळ्या शहरात राहणारे मित्र मैत्रिणी हा व्हिडिओ बनवून सोशल मीडियावर शेअर करत आहेत. असाच एक व्हिडिओ नांदेडच्या कोमल ढवळे हिच्या पुढाकाराने तयार करण्यात आला असून त्यात महाराष्ट्रातील काही तरुण-तरुणींचा सहभाग आहे. या गाण्याला सोशल मीडियावर चांगला प्रतिसाद मिळत आहे.
नांदेडची कोमल ढवळे हिच्या संकल्पनेतून हा व्हिडिओ बनवला असून हा व्हिडिओ मुंबई, नागपूर आणि औरंगाबाद येथील मित्रांनी आपापल्या घरातून व्हिडिओ शूट केला आहे. यामध्ये अचिन मेश्राम, अस्मिता साबळे, डीजे प्रविनी गिराम, माधुरी लोकरे, रेश्मा शेख, सार्थक कुलकर्णी, विशाखा धिवर, विशाल भोगले आहेत. तर हा संपूर्ण व्हिडिओ एडिटिंग स्वप्नील कापसे यांनी केला आहे.
आम्ही लॉकडाऊनच्या काळात प्रशासनाचे सर्व नियमांचे पालन करत आहोत. या काळात कोरोना संक्रमित लोकांना प्रोत्साहित करण्यासाठी घरीच बसून काहीतरी करण्याचा विचार होता. 'मुस्कुराएगा इंडिया' हे गाणं पाहून आपणही असे गाणं बनवावं असा विचार आला आणि सर्व मित्रांना कॉल करून आम्ही हे गाणं बनवलं. लवकरच या कोरोना संकटातून बाहेर पडून 'मुस्कुराएगा इंडिया' म्हणत सर्वांना प्रोत्साहित करण्याचा प्रयत्न करत आहोत. - कोमल ढवळे, नांदेड