नांदेड : जिल्ह्यात कोरोनाचा कहर सुरुच आहे़ मागील २४ तासात आणखी पाच जणांचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला आहे़ यामधील चौघेजण नांदेड परिसरातील आहेत़ तर एकजण नायगाव येथील आहे़ या पाच जणांच्या मृत्यूमुळे जिल्ह्यातील कोरोना बळींची संख्या १३४ वर जावून पोहोचली आहे़ दरम्यान गुरुवारी आणखी ८२ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आल्याने जिल्ह्यातील एकूण रुग्णांची संख्या ३ हजार ६९९ एवढी झाली आहे़
कोरोनाचा मृत्यूदर कमी करण्यासाठी जिल्हा आरोग्य यंत्रणा युद्धपातळीवर प्रयत्न करीत आहे़ मात्र त्यानंतरही मृतांची संख्या वाढत असल्याचे चित्र आहे़ मागील २४ तासात नांदेड शहरातील नाईकनगर येथील ७८ वर्षीय पुरुषाचा, बळीरापूर येथील ३० वर्षीय महिलेचा, धनेगाव येथील ४९ वर्षीय महिलेचा तर दिलीपसिंघ कॉलनी येथील ५८ वर्षीय पुरुषाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला़ नायगाव येथील ५५ वर्षीय व्यक्तीवर नांदेडच्याच खाजगी रुग्णालयात उपचार सुरु होते़ या पुरुषाचाही गुरुवारी मृत्यू झाल्याने जिल्ह्यातील कोरोना बळींची संख्या १३४ झाली आहे़
गुरुवारी ६२९ अहवाल प्राप्त झाले़ यातील ५२० अहवाल निगेटिव्ह आले तर ८२ जणांना कोरोनाची बाधा झाल्याचे स्पष्ट झाले़ यातील १९ बाधीतांची स्वॅब तपासणी तर ६३ जण हे अॅन्टीजण तपासणीतून बाधीत असल्याचे उघड झाले़ यामध्ये स्वॅब तपासणीत बाधीत आढळलेल्यामध्ये नांदेड मनपा आणि धर्माबाद क्षेत्रातील प्रत्येकी ४, लोहा, देगलूर, नांदेड ग्रामीण येथील प्रत्येकी २, मुखेड ३ तर बिलोली, भोकर येथील प्रत्येकी एकाचा समावेश आहे़ अॅन्टीजेन चाचणीमध्ये ६३ जण बाधीत असल्याचे पुढे आले़ यामध्ये नांदेड मनपा क्षेत्रातील १६, मुखेड १८, कंधार ६, बिलोली आणि देगलूर येथील प्रत्येकी ४, उमरी आणि किनवट येथील प्रत्येकी २, भोकर, धर्माबाद, परभणी, नायगाव येथे प्रत्येकी १ रुग्ण आढळल्याने जिल्ह्यातील एकूण बाधितांचीसंख्या ३ हजार ६९९ एवढी झाली आहे़
७१ जणांनी केली कोरोनावर मातगुरुवारी जिल्ह्यातील विविध कोविड केअर सेंटरमध्ये उपचार सुरु असलेल्या ७१ जणांनी कोरोनावर यशस्वीपणे मात केल्याने या रुग्णांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली आहे़ त्यामुळे आजवर कोरोनामुक्त झालेल्यांची संख्या २ हजार १२७ एवढी झाली आहे़ गुरुवारी कोरोनामुक्त झालेल्यामध्ये देगलूर आणि मुखेड कोविड सेंटरमधील प्रत्येकी १५, खाजगी रुग्णालयातील १२, माहूर येथील १०, नायगाव आणि हदगाव येथील प्रत्येकी ८ तर लोहा आणि शासकीय आयुर्वेदीक कोविड केअर सेंटर नांदेड येथील प्रत्येकी १ रुग्णाचा समावेश आहे़.
१४१९ जणांवर उपचार सुरुजिल्ह्यातील विविध कोविड केअर सेंटरमध्ये सध्या १४१९ रुग्णांवर उपचार करण्यात येत आहेत़ यामध्ये विष्णूपुरी येथील वैद्यकीय महाविद्यालयात १८६, पंजाब भवन सेंटरमध्ये ५१५, जिल्हा रुग्णालय ४०, नायगाव ४३, बिलोली ३१, मुखेड १२०, देगलूर १०१, लोहा १३, हदगाव ३४, भोकर १८, कंधार १४, धर्माबाद ३५, किनवट ३६, अर्धापूर ३४, मुदखेड २४, हिमायतनगर १, माहूर ५, नांदेड आयुर्वेदिक रुग्णालय २९, बारड ४, उमरी कोविड केअर सेंटरमध्ये ५, खाजगी रुग्णालये १२५, औरंगाबाद संदर्भित ४ तर निजामाबाद आणि हैद्राबाद संदर्भित प्रत्येकी १.