नांदेड विभागात येणाऱ्या नऊ आगारांत जवळपास ६२५ बसेस आहेत. त्यापैकी सर्वाधिक बसेस नांदेड आगारात आहेत. किरकोळ देखभाल-दुरुस्ती, पम्पचर काढणे आदी कामे संबंधित आगारातील यांत्रिकी विभागात केले जातात. परंतु, इंजिन दुरुस्ती अथवा मोठी कामे नांदेड येथील विभागीय कार्यालय परिसरात असलेल्या विभागीय कार्यशाळेत केली जातात. बसमध्ये नियमितपणे ऑइल बदली, सर्व्हिसिंग करणे ही कामे होतात. परंतु आयुर्मान अधिक झालेल्या आणि ग्रामीण भागातील खराब रस्त्यांवर धावणाऱ्या बसेसच्या क्लच प्लेट तुटणे, स्टेरिंग, ब्रेक बेल्ट आदी नादुरुस्त होऊन बसेस रस्त्यावर बंद पडण्याचे प्रमाण अधिक आहे. त्यात शहरी भागापेक्षा ग्रामीण अथवा जिल्हाअंतर्गत चालविण्यात येणाऱ्या बसेस अधिक प्रमाणात बंद पडतात. परंतु, बंद पडलेल्या बसेसमधील प्रवासी वाहतूक करण्यासाठी तत्काळ नजीकच्या आगारात संपर्क साधून बस बोलावून घेतली जाते.
रस्त्यात एसटी बंद पडण्याची कारणे
नांदेड विभागात असलेल्या जवळपास सर्वच बसेस देखभाल-दुरुस्ती करून नियमितपणे मेंटेनन्स केलेल्या असतात. त्यामुळे रस्त्यावर ऐनवेळी काही तांत्रिक बिघाड म्हणजे बेल्ट तुटणे, पम्पचर होणे, क्लच प्लेट, बूस्टन खराब होणे अथवा इंजिनमध्ये अचानक तांत्रिक बिघाड होऊन बस बंद पडते. त्यातही जुजबी कारण असेल तर चालक आणि वाहक हेच बसची तात्पुरती दुरुस्ती करून बस नजीकच्या आगारात घेऊन जातात.
दहा वर्षांवरील १४७ बसेस
नांदेड विभागात उपलब्ध असलेल्या जवळपास १४७ बसेसला १० वर्षे पूर्ण झाली आहेत. त्यानंतर नऊ वर्षे असलेल्या १७१, आठ वर्षे झालेल्या ११५, सात वर्षे असलेल्या १७, सहा वर्षे पूर्ण झालेल्या ६ तर पाच वर्ष पूर्ण झालेल्या ३० बस नांदेड विभागात आहेत. त्यात मागील वर्षात मिळालेल्या ५१ बसेस या नवीनच आहेत.
देखभाल-दुरुस्तीवर लाखोंचा खर्च
नांदेड विभागात असलेल्या विभागीय कार्यशाळेत बसच्या देखभाल-दुरुस्तीवर महिन्याकाठी लाखो रुपयांचा खर्च होतो. त्यात नवीन साहित्य टाकण्यापासून ते दुरुस्तीसाठी लागलेल्या विविध वस्तू, पार्ट खरेदीसाठीचाही खर्च असतो.
नांदेड विभागात जवळपास सर्वच बसेसच्या देखभाल-दुरुस्तीची कामे वेळेत केली जातात. त्यातही लांब पल्ल्यासाठी चांगल्या स्थितीत असलेल्या बसच वापरात घेतल्या जातात. एखाद्या वेळी ऐनवेळी तांत्रिक बिघाड होऊन बस बंद पडली तर तत्काळ पर्यायी व्यवस्था केली जाते.
- संजय वावळे, विभागीय वाहतूक अधिकारी, नांदेड