या मुलाखतींसाठी सकाळपासूनच उमेदवारांनी गर्दी केली होती. परिचारिका पदासाठी हजारो महिला उमेदवार कागदपत्रांसह महापालिकेत दाखल झाल्या होत्या. त्याचवेळी इतर पदांसाठीही हजारो उमेदवार एकत्रित आले. महापालिका परिसरात गर्दीच गर्दी झाली. महापालिकेच्या मुख्य इमारतीत या मुलाखती ठेवल्याने प्रचंड गर्दी झाली. येथे कोरोना नियमावलीचा फज्जा उडाला. त्यामुळे कोरोनाच्या या महामारीत मुख्य इमारतीतील मुलाखती कोरोना नियंत्रणासाठी होत्या का निमंत्रणासाठी? हा प्रश्न गर्दी पाहून प्रत्येक जण विचारत होता. यापूर्वी महापालिकेने कंत्राटी पदाची भरती स्टेडियम परिसरातील डॉ. शंकरराव चव्हाण सभागृहात केली होती. या वेळीही ती तेथेच करता आली असती. परंतु मुख्यालयात मुलाखती ठेवून एकच गर्दी करण्यात आली. या गर्दीमुळे महापालिकेतील कर्मचाऱ्यांमध्येही भीतीचे वातावरण पसरले होते. त्याचवेळी मुख्य रस्त्यावरून जाणाऱ्या नागरिकांमध्ये महापालिकेच्या या ढिसाळ नियोजनाची चर्चा सुरू होती.
चौकट -----------------
याबाबत उपायुक्त डॉ. बाबूराव बिक्कड यांनी सदर प्रक्रियेत वैद्यकीय अधिकारी या चार पदांसाठी ११ अर्ज आल्याचे सांगितले. त्यातील १० अर्ज प्राप्त ठरले. चौघांची निवड करण्यात आली असून, सहा उमेदवार प्रतीक्षा यादीत असल्याचे सांगितले. स्टाफ नर्सच्या चार पदांसाठी ४८ अर्ज आले होते. त्यातील सर्व अर्ज पात्र ठरले. चार उमेदवारांची निवड करण्यात आली असून, उर्वरित प्रतीक्षा यादीत असल्याचे ते म्हणाले. प्रयोगशाळा तंत्रज्ञ आणि २४ वॉर्डबॉयसाठीही अनेक अर्ज प्राप्त झाले. याबाबत प्रक्रिया सुरू असल्याचे डॉ. बिक्कड यांनी सांगितले.