गोदावरी दुथडी भरून वाहत असलेले चित्र नांदेडकरांनी मंगळवारी पाहिले. हे चित्र पाहून मनातून समाधानी झाले असले तरी नांदेड महापालिकेच्या कारभाराबाबत मात्र बोटे मोडत आहेत. चांगला पाऊस, विष्णुपुरी प्रकल्पही जूनमध्येच १०० टक्के भरलेला असतानाही नांदेडला पाणीपुरवठा तीन दिवसाआड होत आहे. महापालिकेत एकहाती सत्ता असताना मूलभूत प्रश्न सुटावेत ही सामान्य माणसांची अपेक्षा. त्यात आपले प्रश्न महापालिकेत आपल्या प्रभागाच्या नगरसेवकांनी मांडावेत हीपण एक रास्त अपेक्षा. मात्र मे संपला, जून अर्ध्यावर आला तरी या विषयावर एकाही नगरसेवकाने तोंड उघडले नाही. आपल्या प्रभागातील नगरसेवक का बोलत नसावेत हाच प्रश्न शहरातील नागरिकांना पडला आहे. सत्ताधारी तर सत्ताधारी; पण बोटावर मोजण्याइतके असलेले विरोधकही नागरिकांच्या प्रश्नांवर ब्र काढत नाही हेही नवलच. त्यामुळे आता आपले प्रश्न मांडणार तर कोण याबाबत नांदेडकर चिंतेत आहेत. प्रश्न सोडवणे तर दूर; पण प्रश्नाला वाचाही फुटत नसेल तर करायचे काय हा प्रश्न नांदेडकरांना पडला आहे.
श्रेयासाठी स्पर्धा
राजकारणी मंडळी कोणत्या विषयाचे श्रेय कसे घेईल, याचा काही नेम नसतो. चांगले काम असेल तर श्रेय घ्यायचे, अन्यथा विरोधकांच्या नावाने बोटे मोडायचे... असा हा ठरलेला कार्यक्रम. आता नांदेडच्या सिडकोतील घरांच्या हस्तांतरणाचा प्रश्न नुकताच श्रेयवादाचा ठरला. सिडकोतील घरे मूळ मालकाच्या अनुपस्थित थर्ड पार्टीच्या नावाने करून देण्यासाठी यापूर्वी अनेकदा प्रयत्न करण्यात आले. २००८ पूर्वी ज्या प्रमाणे सिडकोतील घरे हस्तांतरण होत होते. त्याच प्रमाणे ते आताही करून द्यावे, अशी मागणी होती. या मागणीला आता मंजुरी मिळाली आहे. यासाठी ज्यांनी सतत ‘बाण’ सोडले होते, ते आता मागे पडले आहेत. ज्यांच्या हातात आता या भागाची सूत्रे आहेत, त्यांनी मात्र ‘पंजा’ पुढे करीत या भागातील नागरिकांची भाग्यरेखा आपल्याच हातात असल्याचे सांगितले. त्यामुळे धनुष्याची दोरी ताणली गेली आहे. आता धनुष्य आणि पंजा यांचे जवळचे नाते निर्माण झाले असले तरी श्रेयवादावरून ही दोन्ही जण आमने-सामने आले आहेत. ही कुजबुज सिडकोतच नव्हे तर शहरातही सुरू आहे.
प्रभारी पोलीस अधीक्षकांचे पडतेय स्वप्न
जिल्ह्यात गुन्हेगारी मोठ्या प्रमाणात वाढली असताना नांदेड पोलीस दलातील अधिकारी वर्गात सध्या प्रचंड खदखद आहे. एकमेकांना शह देण्यासाठी कुरघोडीचे राजकारण करण्यात येत आहे. त्यासाठी एकमेकांच्या विरोधातील कच्चे दुवे शोधून दस्तावेजही गोळा करण्यात आले आहेत. नांदेडला यापूर्वी कर्तव्य बजाविलेल्या एका अधिकाऱ्याला म्हणे सध्या प्रभारी पोलीस अधीक्षक पदाची स्वप्ने पडत आहेत. यापूर्वी नांदेडात अप्पर पोलीस अधीक्षक शहाजी उमाप यांनी जवळपास एक वर्षाहून अधिक काळ प्रभारी पोलीस अधीक्षकपद सांभाळले होते. आता तोच कित्ता गिरविण्यासाठी हालचाली सुरू झाल्या आहेत. त्याची पोलीस दलात मात्र चवीने चर्चा सुरू आहे. एकमेकांच्या हद्दीत केलेल्या कारवायांमुळे अधिकाऱ्यांतील वितुष्ट आणखीच वाढले आहे. या कारवायांमुळे दोन्ही गटातील जवळच्या लोकांची नाराजी झाल्याचेही समजते. आणखी किती काळ हे शीतयुद्ध सुरू राहील हे मात्र सांगता येत नाही. परंतु या प्रकारामुळे जिल्हा पोलीस दलाच्या अब्रूची लक्तरे मात्र वेशीवर टांगली जात आहेत.