बिलोली (नांदेड ) : अवैध वाळू वाहतूक करणाऱ्या २ हायवा ट्रक सोडण्यासाठी उपविभागीय अधिकारी अमोलसिंह अंकुशराव भोसले यांच्यासाठी २ लाख रुपयांची लाच स्वीकारणाऱ्या दोघांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने ताब्यात घेतले आहे. उपविभागीय अधिकारी भोसले हे फरार आहेत.
तालुक्यातील सुप्रसिद्ध लालरेतीची महाराष्ट्रासह तेलंगणा, कर्नाटक राज्यात मोठी मागणी आहे. तालुक्यात चार वाळूपट्टे आहेत. दोन महिन्यांपूर्वी महसूल विभागाच्या पथकाने अवैध वाळू वाहतूक करणाऱ्या २ हायवा ट्रक ताब्यात घेतल्या. त्यावर दंड ठोठवण्यात आला. मात्र, दंडाची रक्कम भरूनही ट्रक सोडण्यात येत नव्हत्या. उपविभागीय अधिकारी अमोलसिंह भोसले यांनी निझामाबाद जिल्ह्यातील खाजगी व्यक्ती श्यामकुमार बोनिंगा यांच्या मार्फत ट्रक मालकास २ लाख रुपयाच्या लाचेची मागणी केली. तर आंध्रप्रदेशातील मिरयालगुडा येथील श्रीनिवास जिनकला याने ट्रक मालक आणि उपविभागिय अधिकारी भोसले यांच्यात मध्यस्ती केली. ३१ ऑगस्ट रोजी बोनिंगा याने शहरातील बसस्थानकावर तक्रारदारांकडून २ लाखाची लाच स्वीकारली. यावेळी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने त्यास रंगेहात पकडले. यानंतर उपविभागिय अधिकारी अमोलसिंह भोसले, श्यामकुमार साईबाबु बोनिंगा आणि श्रिनिवास सत्यनारायणा जिनकला यांच्याविरुद्ध बिलोली पोलीस स्टेशनमध्ये भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम १९८८ (संशोधन २०१८)अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला.
ही कारवाई पोलीस अधिक्षक कल्पना बारवकर, अपर पोलीस अधीक्षक अर्चना पाटील, पोलीस उपअधिक्षक विजय डोंगरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपअधिक्षक प्रशांत संपते, पोलीस निरीक्षक बाबासाहेब काकडे, पो.ना.हनुमंत बोरकर, किशन चिंतोरे, सचिन गायकवाड, अमरजितसिंह चौधरी, अंकुश गाडेकर, सुरेश पांचाळ, मारोती सोनटक्के, अनिल कदम यांच्या पथकाने केली. पुढील तपास पोलीस उपअधिक्षक प्रशांत संपते हे करत आहेत.