लातूर : उत्तम साठवणुकीची व्यवस्था नसल्याने देशात दरवर्षी २२ हजार कोटींच्या कांद्याचे नुकसान होते. वाहतुकीच्या मर्यादा असल्याने निर्यातीवर बंधने येतात. त्यामुळेच जलमार्ग बांधण्यावर भर दिला जात असून, येणाऱ्या काळात मराठवाडा, विदर्भातील कापूस मुंबईमार्गे निर्यात करण्याऐवजी थेट बांगलादेशला पाठविता येईल. त्यासाठी विद्यार्थ्यांनी आत्मनिर्भर भारताकरिता संशोधनवृत्ती जोपासली पाहिजे, असे मत केंद्रीय वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी शुक्रवारी व्यक्त केले.
लातूरच्या त्रिपुरा कनिष्ठ महाविद्यालयाच्या वतीने केंद्रीय मंत्री गडकरी यांचे ‘आत्मनिर्भर भारत’ विषयावर ऑनलाइन व्याख्यान झाले. यावेळी गडकरी म्हणाले, मराठवाडा, विदर्भात कापूस पिकतो. त्याला योग्य भाव मिळण्यासाठी परदेशात निर्यात वाढली पाहिजे. त्यासाठी दळणवळणाची साधने आवश्यक असून, आपण हल्दिया ते वाराणसी असा जलमार्ग विकसित केला आहे. पुढे बांगलादेशातही जलमार्गाद्वारे पोहोचता येईल. वाहतुकीवरील खर्च कमी झाला की उत्पन्न वाढेल आणि भाव मिळेल.
शेणाचा पेंट आणि ग्रामविकास...शेणापासून पेंट बनविला आहे. दिल्लीतील माझ्या घराला तो दिलेला आहे. त्यामुळे ग्रामीण, गरज आणि कृषी आधारित संशोधन वाढविण्याची गरज आहे.