लोकमत न्यूज नेटवर्कनांदेड : महापालिकेकडून दरवर्षी देखभाल दुरुस्तीची कोट्यवधी रुपयांची कामे केली जातात़ परंतु, ही कामे फक्त झोननिहाय केली जातात़ यापुढे ही कामे प्रभागनिहाय करावीत जेणेकरुन त्या कामावर नगरसेवकांचा वॉच राहील अशी मागणी स्थायी समितीच्या सभेत नगरसेवकांनी केली़ त्यामुळे या विषयाला आता वेगळीच कलाटणी मिळाली आहे़महापालिकेकडून विविध जाती-धर्माचे सण, सार्वजनिक उत्सव व इतर वेळी तातडीचे काम म्हणून देखभालदुरुस्ती केली जाते़ ही सर्व कामे एएमआरसी या नावाने केली जातात़ त्यामध्ये रस्त्यावरील खड्डे बुजविणे, मुरुम टाकणे, ड्रेनेज, नालेसफाई यासह इतर कामांचा समावेश असतो़ परंतु, गेल्या काही वर्षांत देखभाल दुरुस्तीच्या नावावर अन्य मोठ्या कामांचाही समावेश करण्यात येत आहे़ही मोठी कामे कोट्यवधी रुपयांची असतात़ विशेष म्हणजे, देखभाल दुरुस्तीच्या नावावर कंत्राटदाराकडून अगोदर काम पूर्ण केले जाते़ त्यानंतर ते मंजुरीसाठी स्थायी समितीकडे पाठविले जाते़ या सर्व प्रवासात अनेकांचे चांगभलं होते़ त्यात कामाच्या दर्जाबाबत मात्र कुणालाच सोयरसुतक नसते़ यावर्षी देखभाल दुरुस्तीच्या प्रस्तावात कंत्राटदाराने ७७ पानांचे तब्बल १६३ हून कामांचे दर निश्चित केले आहेत़ त्यातील काही कामांचे दर हे आयुक्त लहूराज माळी यांच्यासोबत बोलणी झाल्यानंतर कमीही करण्यात आले़ परंतु, ही सर्व कामे झोननिहाय करण्यात येतात़ त्यामुळे नगरसेवकांना आपल्या प्रभागात साधे ड्रेनेजचे झाकण टाकायचे असल्यास ते काम लवकर करण्यात येत नाही़ त्यामुळे देखभाल दुरुस्तीची कामे आता प्रभागनिहाय करावीत, अशी मागणी स्थायीच्या सभेत नगरसेवकांनी केली आहे़ प्रभागनिहाय कामे सुरु झाल्यास त्यावर नगरसेवकांचा वॉच राहणार आहे़ त्यामुळे कंत्राटदारालाही कामाचा दर्जा राखण्यासाठी अंकुश राहणार आहे़शुक्रवारी सभापती शमिम अब्दुल्ला यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत एकूण ९ विषय ठेवण्यात आले होते. यामध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा परिसरातील रंगरंगोटी, दुरूस्ती व बॅरिकेटसाठी कनिष्ठ अभियंता व उपअभियंता यांनी ५ लाख ६ हजार २०० रूपयांच्या अपेक्षित खर्चाचा प्रस्ताव सादर केला. या प्रस्तावाला बैठकीत चर्चेनंतर मंजुरी देण्यात आली. यावेळी काही विषयांवर नगरसेवकांनी आक्षेपही नोंदविले़त्यानंतर लोकशाहीर अण्णा भाऊ साठे नागरी वस्ती सुधार योजनेंतर्गत श्रावस्तीनगर परिसरातील नसरतपूर ते रेल्वे लाईनपर्यंतच्या नाला बांधकामासाठी ४ कोटी १२ लाख ७१ हजार ८०० रूपयांच्या प्रस्तावाला जिल्हाधिकारी यांची प्रशासकीय मान्यता मिळाल्यानंतर बैठकीत चर्चा करण्यात आली.याप्रसंगी स्थायी समितीचे सदस्य अब्दुल सत्तार, मसूद खान, उमेश पवळे, मनपा आयुक्त लहुराज माळी, सतीश देशमुख तरोडेकर, प्रशांत पाटील तिडके, भानुसिंह रावत, डिंपल नवाब, वैशाली देशमुख, ज्योत्स्ना गोडबोले, सहाय्यक आयुक्त संभाजी वाघमारे आदींची उपस्थिती होती.कनिष्ठ अभियंता राजकुमार वानखेडे यांचे निलंबन व सक्तीच्या रजेवर पाठविण्याच्या मुद्यावर बैठकीत चर्चा झाली. परंतु, सदरचे प्रकरण हे प्रशासकीय बाब असल्याने याबाबतचा अभिप्राय व सूचना मागविण्याचा निर्णय बैठकीत झाला.
नांदेड शहरातील देखभाल दुरुस्तीवर नगरसेवकांचा वॉच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 26, 2018 12:48 AM
महापालिकेकडून दरवर्षी देखभाल दुरुस्तीची कोट्यवधी रुपयांची कामे केली जातात़ परंतु, ही कामे फक्त झोननिहाय केली जातात़ यापुढे ही कामे प्रभागनिहाय करावीत जेणेकरुन त्या कामावर नगरसेवकांचा वॉच राहील अशी मागणी स्थायी समितीच्या सभेत नगरसेवकांनी केली़ त्यामुळे या विषयाला आता वेगळीच कलाटणी मिळाली आहे़
ठळक मुद्देस्थायी समितीची सभा : कंत्राटदाराने प्रशासनाला दिली ७७ पानांची दरसूची