राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत निवड झालेल्या समुदाय आरोग्य अधिकारी यांच्यासाठी मार्च २०२० ते ऑगस्ट २०२० या कालावधीत प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले होते. या प्रशिक्षणानंतर घेण्यात आलेल्या परीक्षेत उमेदवारांना गुणवत्तेनुसार समुपदेशनाने आरोग्यवर्धिनी केंद्र-उपकेंद्रात समुदाय आरोग्य अधिकाऱ्यांना आज मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांनी नियुक्त्या दिल्या आहेत.
समुदाय आरोग्य अधिकारी हे पद जबाबदारीचे असून, ग्रामीण भागात नागरिकांचे आरोग्यमान उंचाविण्यासाठी संबंधित अधिकाऱ्यांनी तत्परतेने सुविधा देणे आवश्यक आहे. आरोग्य सेवेच्या माध्यमातून आपणास काम करण्याची संधी मिळाली आहे. या संधीचे प्रत्येकाने सोने करावे, असे आवाहन जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांनी केले आहे. याचवेळी समुपदेशनाने नियुक्त्या झालेल्या अधिकाऱ्यांना सभागृहातच नियुक्तीचे आदेश देण्यात आले. समुपदेशन प्रक्रिया पारदर्शक पार पडल्यामुळे नियुक्ती मिळालेल्या अधिकाऱ्यांनी समाधान व्यक्त केले.