सिडकाे येथील वात्सल्यनगर साेसायटीत गाेविंदराज रमेश दाचावार यांचे घर आहे. तेथेच त्यांचे किराणा दुकान आहे. गुरूवारी दुपारी त्यांच्या घरात अज्ञात तिघांनी प्रवेश केला. यावेळी दाचावार यांच्या पत्नी व त्यांचे दीड वर्षाचे बाळ घरात हाेते. त्यांना चाकूचा धाक दाखवून व बाळाला जीवे ठार मारण्याची धमकी दिल्याने महिला घाबरली. हीच संधी साधून चाेरट्यांनी घरातील ४ लाख रूपये राेख व सुमारे ५० ताेळे साेन्याचे दागिने, अर्धा किलाे चांदी असा ३० ते ३५ लाखांचा ऐवज लुटून नेला. घटनेच्या वेळी दाचावार यांचे आई-वडील बाहेर गेले हाेते.
भरदिवसा घडलेल्या या घटनेने पाेलीस दलात खळबळ उडाली. पाेलिसांनी सीसीटीव्ही तपासले असता दुचाकी वाहनावरून जाणारे तीन जण त्यात कैद झाले. घटनास्थळी पाेलिसांनी इतर माहिती गाेळा केली. तेव्हा दाचावार यांचा चुलत भाऊ त्याच इमारतीत खाली राहताे, त्यांचे संपत्तीचे वाद आहेत ही माहिती पुढे आली. दाचावार यांच्या घरी अधिक सदस्य नाहीत याची कल्पना केवळ त्यांचा चुलत भाऊ श्रीनिवास दाचावार यालाच असल्याचे पाेलिसांच्या निदर्शनास आले. संशयावरून पाेलिसांनी श्रीनिवासवर प्रश्नांची सरबत्ती केली. तेव्हा त्याच्या बाेलण्यात सातत्याने तफावत आढळून आल्याने पाेलिसांचा संशय आणखी बळावला. ३५ लाखांच्या या लुटीचा मास्टरमाईंड श्रीनिवासच असावा अशा निष्कर्षापर्यंत पाेलीस पाेहाेचले असल्याचे नांदेड ग्रामीणचे ठाणेदार अशाेक घाेरबांड यांनी सांगितले. याप्रकरणी श्रीनिवास व दुचाकीवरून आलेल्या तिघांपैकी एकाला ताब्यात घेण्यात आले आहे. इतर दाेघांचाही शाेध सुरू असल्याची माहिती पाेलिसांनी ‘लाेकमत’ला दिली.