मारतळा (जि. नांदेड) : लोहा तालुक्यातील कौडगाव येथे म्हशी धुण्यासाठी डोहातील पाण्यात उतरलेल्या दोन सख्ख्या चुलतभावांचा पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू झाला. तिसऱ्या भावास मात्र पोहण्याचा सराव असल्याने तो कसाबसा पाण्याच्या बाहेर पडला. ही घटना मंगळवार दि. २९ रोजी सकाळी ११ वा. घडली.
कौडगावपासून जवळपास एक कि़मी अंतरावर चराईक्षेत्र व गायरान पट्ट्टा आहे. तेथे अनेक शेतकरी त्यांची जनावरे चारण्यासाठी घेवून जातात़. सध्या कोरोनामुळे शाळांना सुटी असल्याने अनेक मुलेही शेतशिवारात भटकंती करीत आहेत़. कौडगाव येथील अल्पभूधारक गौतम गणपती जोंधळे व रोहिदास गणपती जोंधळे या दोन भावांची तीन मुले म्हशी चारण्यासाठी चराई क्षेत्राकडे गेली होती. त्या क्षेत्रात मुरुमाचे खोदकाम केल्यामुळे एक मोठा खड्ड्डा झालेला आहे़. या खड्डयात मोठ्या प्रमाणात पावसाचे पाणीही साचले होते. पाण्याच्या या डोहात म्हशी उतरल्या होत्या. त्यामागोमाग म्हशींना धुण्यासाठी म्हणून प्रवीण गौतम जोंधळे (वय ८, वर्ग २ रा), शुभम रोहिदास जोंधळे (वय ८, वर्ग २ रा) हे दोघे चुलतभाऊ पाण्यात उतरले. मात्र, पाण्याच्या खोलीचा अंदाज न आल्याने ते खोल पाण्यात गटांगळ्या खाऊ लागले. त्यातच त्या दोघांचा बुडून मृत्यू झाला.
तर अन्य भाऊ राहुल गौतम जोंधळे (वय १० वर्षेे) हाही पाण्यात म्हशी धुण्यासाठी उतरला होता. मात्र, त्याला थोडा पोहण्याचा सराव असल्याने हात-पाय मारत तो बाहेर पडला़. भावांना बुडताना पाहून राहुलने मदतीसाठी हाका मारल्या. पण जवळपास कुणीच नव्हते़.
कौडगाव हे पुनर्वसित गाव असून गावापासून एक कि़लोमीटर अंतरावर मुरमाड जमीनक्षेत्र असल्याने काही जणांनी मनमानी पद्धतीने मुरुमाचे अवैध उत्खनन केले आहे़. त्यामुळेच या ठिकाणी खड्डे पडून चिमुकल्यांना जीव गमवावा लागला, अशी चर्चा गावकरी करत होेते.