तराफे जाळून नष्ट केले
उमरी : तालुक्यातील कौडगाव शिवारात गोदावरी नदीपात्रातून रात्रीच्या अंधारात अवैधरीत्या वाळूचा उपसा करणाऱ्या १३ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, उत्तर प्रदेश व बिहार राज्यातील रहिवासी असलेल्या बारा जणांना जागेवरच अटक करण्यात आली. अंधाराचा फायदा घेऊन एक जण पळून गेला. महसूल विभागाच्या या कारवाईमुळे वाळूमाफियांमध्ये एकच खळबळ उडाली आहे. उपविभागीय अधिकारी डॉ. राजेंद्र खंदारे यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली. उमरी तालुक्यातील कौडगाव शिवारात गोदावरी नदीपात्रातून थर्माकोलच्या तराफ्याच्या साहाय्याने दिवस-रात्र वाळूचा अवैधरीत्या उपसा सुरू असल्याची माहिती उपविभागीय अधिकारी खंदारे यांना मिळाली. त्यावरून १५ डिसेंबर रोजी रात्री ११.३० वाजेच्या सुमारास मंडळ अधिकारी मयूर शेळके, तलाठी अशोक गंगासागर, संतोष मंगरुळे, प्रकाश तायवाडे, हनुमंत गायकवाड, कोतवाल मल्लू कमळे आदींनी कौडगाव शिवारात छापा टाकला. यावेळी थर्माकोलचे दोन तराफे व १३ जण अवैधरीत्या वाळू उपसा करीत असताना सापडले. सदरप्रकरणी मंडळ अधिकारी मयूर शेळके यांच्या तक्रारीवरून माधव बाबूराव येताळे, रा. कौडगाव, ता. उमरी, केदार वर्मा, रा. हदीहा कला, जि. बलिया, उ.प्र., अजित सहा, रा. हदीहा कला, जि. बलिया, उत्तर प्रदेश , शंभू महतो, रा. कंजिया, जि. पुरणिया, बिहार, सुनील बबन प्रसाद, रा.बाजर हलदी, जि.बलिया, उत्तर प्रदेश, केदार सतन यादव, रा. माहाधनपूर चांदपूर, जि.बलिया, उत्तर प्रदेश, रवींद्रकुमार रघुवर यादव, रा. हरिहा कला, जि. बलिया, उत्तर प्रदेश, सुंदर कुमार श्यामलाल यादवनगर, रा. चांददियर, बलिया, उत्तर प्रदेश, जोगिंद्र गौरीशंकर यादव, रा. हरिहा कला, जि.बलिया, उत्तर प्रदेश, रुदल श्यामलाल साह, रा. यादवनगर, जि. बलिया, उत्तर प्रदेश, विश्वनाथ कन्हैया साह, हदिहा कला, उत्तर प्रदेश, जितन राजीव साह, उत्तर प्रदेश, राजेश कन्हैया, हदिया कला, उत्तर प्रदेश या १३ जणांविरुद्ध महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम कायद्यानुसार व भादंविनुसार गुन्हा दाखल करण्यात आला. यातील आरोपी माधव बाबूराव येताळे हा अंधाराचा फायदा घेऊन पळून गेला. पोलीस निरीक्षक दत्तात्रय निकम यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक आर. टी. शेवाळे हे सदर प्रकरणाचा पुढील तपास करीत आहेत.