नांदेड : मुरूम, गिट्टीच्या टिप्परांची वाहतूक करू देण्यासाठी ४ हजार रुपयांची लाच मागणाऱ्या नामदेव ढगे या पोलीस कॉन्स्टेबल विरुद्ध नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलीस सूत्रांच्या माहितीनुसार, ग्रामीण पोलीस ठाण्यातील पोलीस कॉन्स्टेबल नामदेव ढगे हे मुरूम आणि गिट्टीची वाहतूक करणाऱ्या चार टिप्परांची वाहतूक करू देण्यासाठी १२ हजार रुपयांच्या लाचेची मागणी करीत असल्याची तक्रार लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे प्राप्त झाली होती. या तक्रारीआधारे नांदेड एसीबीतर्फे १२ जानेवारी रोजी रात्री पंचासमक्ष पडताळणी केली. यामध्ये ढगे यांनी १२ हजार रुपयांच्या लाचेची मागणी केल्याचे निदर्शनास आले.
दरम्यान, नामदेव ढगे यांनी तक्रारदाराकडे तडजोडीअंती ४ हजार रुपये लाच मिळवण्याचाही प्रयत्न केला़ त्यामुळे नामदेव ढगे विरुद्ध ग्रामीण पोलीस ठाण्यात १३ जानेवारी रोजी सायंकाळी गुन्हा नोंदविण्यात आला़ एसीबीच्या पोलीस अधीक्षक कल्पना बारवकर, अप्पर पोलीस अधीक्षक अर्चना पाटील व पोलीस अधीक्षक विजय डोंगरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोनि. शेषराव नितनवरे पोहेकॉ. किशन चिंतोरे, नाईक पोकॉ. हनुमंत बोरकर, गणेश केजकर, मारुती सोनटक्के, विलास राठोड व अमरजीतसिंह चौधरी यांनी ही कामगिरी यशस्वी केली.