नांदेड : नांदेड, परभणी आणि हिंगोली या जिल्ह्यांतून जाणाऱ्या लोहमार्गावरील गुन्हेगारी घटनांवर नियंत्रण मिळविण्यासाठी नांदेड येथे रेल्वे पोलिस ठाणे कार्यरत आहे. पण, या ठाण्याला सध्या मनुष्यबळाची अडचण सतावत असून, ४७७ किलोमीटर अंतराच्या कार्यक्षेत्रात गुन्हेगारीवर नियंत्रण मिळवण्याचे आव्हान पेलावे लागतेय. नांदेडसाठी मनुष्यबळ वाढविण्याची मागणी होत आहे.
रेल्वेस्थानक आणि लोहमार्गावर गुन्हेगारी घटना घडल्यास त्याचा तपास करणे, आरोपींचा शोध घेऊन त्यांना शिक्षेपर्यंत पोहोचवणे तसेच रेल्वेस्थानकावरील गुन्हेगारी घटनांना आळा घालण्याची जबाबदारी रेल्वे पोलिसांवर असते. छत्रपती संभाजीनगर विभागांतर्गत नांदेड येथे पोलिस ठाणे कार्यरत आहे. नांदेडसह परभणी आणि हिंगोली जिल्ह्यातील रेल्वेस्थानक, लोहमार्ग या पोलिस ठाण्यांच्या कार्यक्षेत्रात येतो. मागील काही वर्षांपासून या रेल्वेस्थानकाला मनुष्यबळाची समस्या सतावत आहे. चार अधिकारी ७७ कर्मचारी अशी मंजूर पदे असताना प्रत्यक्षात ४ अधिकारी आणि ४८ कर्मचाऱ्यांवर कारभार चालविला जात आहे. त्यामुळे काम करताना अडचणींचा डोंगर उभा राहतो. रेल्वे पोलिस ठाण्यासाठी छत्रपती संभाजीनगर येथे स्वतंत्र न्यायालय आहे. आरोपींना न्यायालयात हजर करण्यासाठी पोलिस स्टाफ द्यावा लागतो, काही स्टाफ गस्तीवर ठेवावा लागतो आणि उरलेल्या कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून तपास काम केले जाते.
गुन्हे वाढले, मनुष्यबळ तेवढेच..रेल्वे पोलिस ठाण्यासाठी २००० मध्ये कर्मचाऱ्यांचा आकृतिबंध मंजूर आहे. त्यानुसार कर्मचारी उपलब्ध होतात. मात्र, २००० ते २०२३ या २३ वर्षांत रेल्वे गाड्यांची संख्या दुपटीने वाढली आहे. रेल्वेत प्रवास करणाऱ्या प्रवाशांची संख्या देखील तेवढीच वाढली. पर्यायाने गुन्हेगारी देखील वाढली आहे. त्यामुळे पोलिस ठाण्यांचा आकृतिबंध वाढविण्याबरोबरच मनुष्यबळही त्या प्रमाणात द्यावे, अशी मागणी होत आहे.
सहा पोलिस चौक्यांचा आधारनांदेड रेल्वेस्थानकांतर्गत पूर्णा, परभणी, हिंगोली, उमरी, किनवट आणि मुदखेड या सहा ठिकाणी पोलिस चौकी कार्यरत आहेत. तेथून कारभार पाहिला जातो.
वर्षभरात १ हजार गुन्हेनांदेड पोलिस ठाण्यांतर्गत २०२२ मध्ये एका वर्षात १ हजार ५८ गुन्हे दाखल झाले आहेत. २०२२ च्या तुलनेत यावर्षी ८ महिन्यांतच एक हजार पेक्षा अधिक गुन्हे नोंद झाले आहेत.
४७७ किलोमीटरची हद्दनांदेड ते धर्माबाद ७१ कि.मी.नांदेड ते अंबारी १४७ कि.मी.नांदेड ते मानवत रोड ८६ कि.मी.नांदेड ते कनेरगाव नाका १३७ कि.मी.