नांदेड : लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने सातारा येथे बंदोबस्तासाठी पाठविलेले काही कर्मचारी गैरहजर राहिल्याचे आढळून आले आहेत. अशा बारा पोलीस कर्मचाऱ्यांवर कर्तव्यात कसूर केल्याचा ठपका ठेवत गुन्हे नोंदविण्यात आले आहेत. या कारवाईने पोलीस दलात एकच खळबळ उडाली आहे.
लोकसभा निवडणुकीच्या बंदोबस्तासाठी जिल्ह्यातील वेगवेगळ्या पोलीस ठाण्यांतील कर्मचाऱ्यांसह अन्य शाखेतील जवळपास ४०० कर्मचाऱ्यांना पाठविण्यात आले होते. या ४०० पैकी २५० पोलीस कर्मचारी सातारा येथे पाठविण्यात आले होते. परंतु त्यातील १२ पोलीसांनी दांडी मारली. या अनुषंगाने पोलीस अधीक्षक संजय जाधव यांनी सदर प्रकाराची गंभीर दखल घेतली. निवडणुकीसारख्या अत्यंत महत्त्वाच्या कामात हलगर्जीपणा केल्याने सदर १२ कर्मचाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्याच्या सूचना जिल्हा विशेष शाखेच्या पोलीस उपनिरीक्षकांस त्यांनी दिल्या.
यावरुन लोकप्रतिनिधी अधिनियम १९५१ चे कलम १३४ (१) नुसार या कर्मचाऱ्यावर गुन्हे नोंदविण्यात आले आहेत. कारवाई झालेल्या कर्मचाऱ्यांमध्ये गुलाब आडे (हिमायतनगर), कृष्णा मोतीराम चनोडे (मांडवी), बाबूराव सूर्यवंशी (देगलूर), हुजूरीया (वजिराबाद ठाणे), विजय कोंडजे धुळगंडे (कंधार), सादिक पठाण (शहर वाहतूक शाखा, नांदेड), मुन्वर हुसेन (शहर वाहतूक शाखा, नांदेड), गोपाळ तोटलवार (शिवाजीनगर), देवानंद मोरे (लिंबगांव), राजू कांबळे (मुखेड) आणि मिलिंद लोणे (विमानतळ) यांचा समावेश आहे.