नांदेड : शहरातील प्रमुख मार्गावर अडथळा निर्माण करणार्या मोकाट जनावरांना उचलण्याची कार्यवाही मनपाने मंगळवारी रात्रीपासून सुरू केली आहे. रात्रभर चाललेल्या या कारवाईत ५१ जनावरे कोंडवाड्यात टाकली. आगामी काळात जनावरे रस्त्यावर आढळल्यास मालकाविरुद्ध फौजदारी कारवाई केली जाईल, असा इशारा आयुक्तांनी दिला आहे.
शहरात अनेक दिवसांपासून मोकाट जनावरे भररस्त्यावर ठाण मांडत आहेत. याचा वाहनचालकांना फटका बसत आहे. तसेच अनेक लहान-मोठे अपघातही होत आहेत. परिणामी या जनावरांवर आळा घालण्यासाठी मंगळवारी रात्री महापालिकेचे लेखाधिकारी संतोष कंदेवार, डॉ. रईसोद्दीन यांच्यासह क्षेत्रीय अधिकार्यांनी मोहीम राबवित ५१ मोकाट जनावरे गोकुळनगर येथील कोंडवाड्यात टाकली. बुधवारी दुपारी जनावरांचे मालक तसेच काही संघटनांच्या पदाधिकार्यांनी आयुक्तांची भेट घेऊन सदर जनावरे सोडण्याची विनंती केली. दंडात्मक कारवाई करुन ती सोडण्यात आली. मात्र आगामी काळात आता जनावराच्या मालकाविरुद्ध फौजदारी कारवाई केली जाईल, असा इशारा आयुक्त गणेश देशमुख यांनी दिला आहे. दरम्यान, उन्हाळ्याच्या दिवसांत नागरिकांनी खाद्यपदार्थ कॅरिबॅगमध्ये टाकून उघड्यावर अथवा रस्त्यावर टाकू नये, असे आवाहन करण्यात आले आहे. या कॅरिबॅगमधील अन्न खाल्ल्याने विषबाधेद्वारे जनावरांना बाधा पोहोचते. त्यातून होणारे कटू प्रसंग टाळण्याचे आवाहन मनपाने केले आहे.