नांदेड : जिल्हाभरात पावसाने मागील १५ ते २० दिवसांपासून विश्रांती घेतल्यामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. पावसाने घेतलेल्या दीर्घ खंडामुळे पिके पिवळी पडण्यास सुरूवात झाली असून अनेक ठिकाणी वाढत्या उष्णतेमुळे पिकांनी माना टाकण्यास सुरूवात केली आहे.
यावर्षीच्या मोसमात चांगला पाऊस होईल, असा अंदाज हवामान खात्याने वर्तविला होता. दरम्यान, मोसमाच्या सुरूवातीला जिल्ह्यातील बहुतांश भागात पावसाने चांगली हजेरी लावली. परंतु, जुलै महिन्याच्या शेवटच्या आठवड्यापासून मात्र पावसाने दडी मारली. दरम्यान, पावसाने घेतलेल्या दीर्घ विश्रांतीमुळे मोसमाच्या सुरूवातीला पेरणी केलेल्या शेतकऱ्यांची चिंता आता वाढली आहे. कारण पावसाअभावी पिके कोमेजून जाण्यास सुरूवात झाली असून खरीप हंगाम धोक्यात आला आहे.
दरम्यान, आठ दिवसांपूर्वी एका खाजगी हवामान कंपनीने आॅगस्ट महिना पूर्णपणे कोरडाच राहणार असल्याचे सांगितले. त्यामुळे शेतकऱ्यांच्या चिंतेत आणखी भर पडली आहे. पावसाने जुलै महिन्याच्या शेवटीपासूनच डोळे वटारल्यामुळे तापमानातही वाढ झाली आहे. परिणामी, अनेक भागातील भूजल पातळीत झपाट्याने घट होत असल्याचे चित्र अनेक भागात बघावयास मिळत आहे.
जिल्हाभरातील बहुतांश ठिकाणच्या पिकांची परिस्थिती सध्या चांगली आहे. परंतु, काही भागात पिकांना पाणी मिळणे आवश्यक आहे. अशा ठिकाणी शेतकरी आपली कोवळी पिके जगविण्यासाठी ठिबक सिंचनाद्वारे पिकांना वाचविण्याचा प्रयत्न करीत आहेत.
आणखी आठ दिवस पावसाने अशीच विश्रांती घेतल्यास याचा दुष्परिणाम संपूर्ण खरीप हंगामावर होणार आहे. त्यामुळे पिकांवर आतापर्यंत केलेला खर्च वाया जाण्याची भीती आता शेतकऱ्यांना भेडसावत आहे. त्यातच कापसावर सध्या गुलाबी बोंडअळीचे संकट घोंगावत आहे. तर दुसरीकडे हे संकट टाळण्यासाठी प्रशासनाच्या वतीने विविध उपाययोजना केल्या जात असून शेतकऱ्यांसह सामान्यांही आता दमदार पावसाची प्रतीक्षा आहे.