कॅप्शन : नांदेड येथील महालाेकअदालतीत प्रलंबित दंड भरण्यासाठी वाहनधारकांनी केलेली गर्दी.
नांदेड : राज्यभरातील १० लाखांपेक्षा अधिक वाहनधारकांकडे दंडाची ४१७ काेटी रुपयांची रक्कम थकीत आहे. या रकमेच्या वसुलीसाठी विधीसेवा प्राधिकरणाच्यावतीने आयाेजीत महालाेकअदालतीत दंड भरण्याची संधी देण्यात आली हाेती. ही रक्कम भरण्यासाठी राज्यभर वाहनधारकांनी गर्दीही केली. एकट्या नांदेड परीक्षेत्रातील चार जिल्ह्यात ७१ लाख ५ हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला.
माेटर वाहन कायद्याचा भंग केला म्हणून वाहतूक पाेलीस, महामार्ग पाेलिसांकडून वाहनधारकांना दंड केला जाताे. ऑनलाईन पद्धतीने हा दंड हाेत असल्याने बहुतांश जागेवरच त्याची वसुली हाेत नाही. परंतु नंतर दंडाची ही रक्कम भरण्यास टाळाटाळ केली जाते. राज्यात १० लाख वाहनधारकांकडे ४१७ काेटी ४१ लाख रुपयांची रक्कम दंड म्हणून थकीत आहे. या रकमेच्या वसुलीसाठी अप्पर पाेलीस महासंचालक डाॅ. भूषणकुमार उपाध्याय (वाहतूक) यांनी माेहीम उघडली. त्यात सुरुवातीला २० टक्के लाेकांनी ५ काेटी ५२ लाख रुपये दंड भरला. त्यानंतर आणखी संधी म्हणून महालाेकअदालत घेण्यात आली. त्यात हा दंड भरण्यासाठी उपस्थित राहण्याचा अल्टिमेटम वाहनधारकांना देण्यात आला. २० ते २५ सप्टेंबर या काळात ठिकठिकाणी महालाेकअदालत पार पडल्या. तेथे नागरिकांनी दंड भरण्यासाठी गर्दीही केली. त्यात आणखी काेट्यवधी रुपयांचा दंड वसूल झाला.
चाैकट....
हिंगाेलीत सर्वाधिक
नांदेड परीक्षेत्रामध्ये एकूण ७१ लाख ५ हजार २५० रुपयांचा दंड महालाेकअदालतीच्या माध्यमातून वसूल झाला. त्यात सर्वाधिक २२ लाख ६९ हजारांची रक्कम हिंगाेली जिल्ह्यातील आहे. त्याखालाेखाल लातूर १८ लाख ३४ हजार, नांदेड ८ लाख १ हजार तर परभणी जिल्ह्यात सर्वात कमी २२ हजार २०० रुपयांच्या दंडाची रक्कम वसूल झाली.