चोऱ्यांचा तपास लागेना
मुखेड - शहरासह ग्रामीण भागात मागील वर्षभरात चोरट्यांनी धुमाकूळ घातला. चोरट्यांचा शोध लागत नसल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. दुसरीकडे चोरट्यांनी पोलिसांसमोर आव्हान निर्माण केले. याशिवाय शहरातील विविध ठिकाणाहून दुचाकीही लांबविण्यात आल्या. एकाही घटनेचा तपास लावण्यात पोलिसांना यश आले नाही.
विजेअभावी कृषीपंपधारक त्रस्त
बिलोली - तालुक्यातील विविध भागात वीजपुरवठा सुरळीत नसल्याने कृषीपंप धारक त्रस्त झाले आहेत. यामुळे शेती उपयाेगी कामे करण्यास अडचण येत असल्याची तक्रार शेतकऱ्यांनी केली. तर उन्हाळा असल्यामुळे विजेचा वापर जास्त होत असल्यामुळे दाब येत असल्याचे महावितरणचे म्हणणे आहे.
आरोग्य साहित्य वाटप
भोकर - वंचित बहुजन आघाडीच्या वतीने तहसील कार्यालय कोविड सेंटर, पोलीस कार्यालय, पंचायत समिती, भटक्यांच्या पालावर आरोग्य साहित्य वाटप करण्यात आले. यावेळी तालुकाध्यक्ष सुनील तांबे, नामदेव आयलवाड, माणिक जाधव, सुरेश फुगले, आनंद एडके, शेख शब्बीर, संतोष आणेराये, बालाजी अनंतवाड, राजू दांडगे, सुभाष तेले, सुनील प्रकाश आदी उपस्थित होते.
मारहाण प्रकरणी निवेदन
माहूर - तालुक्यातील दत्तमांजरी येथील कामगार कृष्णा जाधव यांना पोलीस उपनिरीक्षकांनी केलेल्या मारहाण संदर्भात पालकमंत्री अशोकराव चव्हाण व जिल्हाधिकारी विपीन ईटणकर यांना निवेदन देऊन लक्ष वेधण्यात आले. तसेच बांधकाम कामगारांच्या समस्या सोडवण्याची मागणी करण्यात आली. यावेळी जिल्हा सचिव संजय सुरोशे, अनिसखान, आजाद खान, मुकटे आदी उपस्थित होते.
कयाधूतून वाळूची तस्करी
हदगाव - तालुक्यातील कयाधू नदी पात्रातून वाळू माफियांकडून रोज शेकडो ब्रास वाळूची तस्करी सुरू आहे. नदीपात्रापासून जवळच असलेल्या हस्तरा, बोरगाव, निवघा या गावातील २० ते २५ ट्रॅक्टर दिवसाढवळ्या वाळू उपसा करीत आहेत. महसूल प्रशासन याकडे लक्ष देण्यास तयार नसल्याचे दिसते.
विद्युत तारांची चोरी
उमरी - तालुक्यातील बितनाळ येथील शेतातील विद्युत खांबावरील तारा चोरीस गेल्याची तक्रार शेतकरी गणेश कोंडेवार यांनी महावितरणकडे केली आहे. शेत गट नं.१०४ मधील असलेल्या तीन विद्युत खांबावरील चारपदरी ॲल्युमिनियमच्या तारा लांबविण्यात आल्या. २६ एप्रिलच्या रात्री ही घटना घडली. पोलिसांनी चोरट्यांचा तपास लावावा अशी मागणी होत आहे.
शहापूर येथे चोरी
अर्धापूर - तालुक्यातील शहापूर येथील आखाड्यावरून १७ हजार रुपये किमतीचे साहित्य लांबविण्यात आल्याची घटना ७ मे रोजी घडली. चोरट्यांनी एक मोटार, बोर्डचे स्टाटर, किटकॅट असा ऐवज लांबविला. याप्रकरणी समाधान जाधव यांनी दिलेल्या फिर्यादीवरून अर्धापूर पोलिसांनी गुन्हा नोंदवला आहे.
बियाणांची जुळवाजुळव
किनवट - हवामान विभागाने यंदा वेळेवर मान्सून दाखल होण्याचा अंदाज व्यक्त केल्याने शेतकऱ्यांकडून खतासह बियाणांची जुळवाजुळव सुरू झाली आहे. गतवर्षातील खरीप हंगामामध्ये बियाणांची उगवण क्षमता तसेच पावसामुळे सोयाबीनला बसलेला फटका लक्षात घेता बियाणांचा तुटवडा आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी घरातील सोयाबीन बियाणांची पेरणी करावी असे आवाहन कृषी विभागाने केले आहे.
३५ लाखांचा निधी मंजूर
लोहा - शहरातील बडेसाब दर्गा जवळ मुस्लिम समाजाने कब्रस्थान आहे. या कब्रस्तानात जाण्यासाठी नदीवरील पुलाची मागणी अनेक वर्षांपासून सुरू होती. अंत्यविधीसाठी होणारा त्रास लक्षात घेऊन नगराध्यक्ष गजानन सूर्यवंशी यांनी नगरपालिकेकडून पुलाच्या बांधकामासाठी ३५ लाखांचा निधी मंजूर केला आहे.
अवकाळी पावसाने नुकसान
माहूर - तालुक्यात मागील आठ-दहा दिवसांपासून अवकाळी पाऊस पडत असल्याने पिकांचे मोठे नुकसान झाले. रब्बी हंगामातील भुईमुगाच्या पिकाला शेंगा न लागल्याने शेतकरी अडचणीत आला असतानाच वादळी वारे व पावसाने त्यात भर घातली. तालुका कृषी कार्यालय पंचनामा करण्याकडे दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप शेतकऱ्यांचा आहे.
धर्माबाद बाजारपेठेत गर्दी
धर्माबाद - रमजान ईदच्या पार्श्वभूमीवर सोमवारी धर्माबाद बाजारपेठेत खरेदीसाठी मोठी गर्दी झाली होती. लॉकडाऊन असला तरीही अनेकांनी न घाबरता बाजारात येणे पसंद केले. अत्यावश्यक सेवेमध्ये मेडिकल, किराणा दुकाने, दूध डेअरी, बेकरी आदींचा समावेश असला तरी कपड्यांची दुकाने, बांगड्यांची दुकाने, जनरल स्टोअर्स, इलेक्ट्रिकल दुकाने आदी दुकानेही चालू होती. तेथेही लोकांनी गर्दी केली.
उमरीला इफ्तार पार्टी
उमरी - येथील नगरपालिकेच्या वतीने मुस्लिम बांधवांसाठी इफ्तार पार्टी देण्यात आली. यावेळी जिल्हा बँकेचे संचालक कैलास गोरठेकर, उपनगराध्यक्ष महंमद रफीक, नगरसेवक सय्यद फारूख, शेख रशीद, माजी नगरसेवक एजाज खान, नगरसेवक बाबू बेग, जावेद खान, अशोक मामीडवार, सोनू वाघमारे, साईनाथ जमदाडे, रतन खंदारे, नंदकुमार डहाळे, अमित पटकुटवार, गजानन लकडेवार आदी उपस्थित होते.
अवकाळी पावसाचा फटका
लोहा - दोन दिवसांच्या विश्रांतीनंतर रविवारी पुन्हा लोहा व परिसरात अवकाळी पावसाने हजेरी लावली. पावसामुळे उन्हाळी ज्वारी, आंबा, भाजीपाला, फळभाज्यांचे मोठे नुकसान झाले. काही ठिकाणी सखल भागात पाणी साचले. तर काही ठिकाणी रोडवरून पाणी वाहत होते. तालुक्यात कुठेही अनुचित घटना झाली. नाही.