बीड : विष्णूपुरी येथील डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात यापूर्वी नेहमी किरकोळ दुरुस्तीसाठी अनेक दिवस हेतूपुरस्पर बंद ठेवण्यात येणारी सिटीस्कॅन आणि एमआरआय मशीन आता मात्र सुरळीत आहेत; परंतु रुग्णांना पैसे खर्च करून औषधे बाहेरुन आणण्याची वेळ येत आहे. त्याचा फटका
गरीब रुग्णांना बसत आहे.
नूतन अधिष्ठाता डॉ. सुधीर देशमुख यांनी रुग्णालयाला आता चांगलीच शिस्त लावल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे कर्मचारी, डॉक्टर आता वेळेवर रुग्णालयात उपस्थित राहत आहेत.
जिल्हा रुग्णालयामधील सद्य:स्थिती
जिल्हा रुग्णालयातील नवीन दोनशे खाटांची इमारत कार्यान्वित करण्यात आली आहे. त्याचबरोबर जुन्या इमारतीत बाह्य रुग्ण विभाग चालविला जातो. या ठिकाणी दुपारी बारा वाजेपर्यंत रुग्णांची तपासणी केली जाते. आजघडीला चारशे ते साडेचारशे रुग्णांची दररोज ओपीडी आहे. अत्यवस्थ रुग्णांना मात्र विष्णूपुरी येथील रुग्णालयात पाठविले जाते. इतर उपचार येथेच केले जातात.
शासकीय मेडिकल कॉलेजमधील स्थिती
विष्णूपुरी येथील रुग्णालयात दररोज साधारणत: दीड हजार रुग्णांची ओपीडी आहे. या ठिकाणी शेजारील चार जिल्ह्यांतून रुग्ण दाखल होतात. अत्यंत गुंतागुंतीच्या शस्त्रक्रिया येथे केल्या जातात; परंतु किरकोळ औषधेही रुग्णांना बाहेरुन आणण्याची वेळ येते. त्यामुळे गरीब रुग्णांना पदरचे पैसे खर्च करून ही औषधे विकत घेण्याची वेळ येते.